पुढारी ऑनलाईन डेस्क : Hardik Pandya vs Shardul Thakur : 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर हार्दिक पंड्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. हार्दिक त्यानंतर टीम इंडियाकडून फक्त एक फलंदाज म्हणून खेळला पण फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. अष्टपैलू हार्दिकची एक फलंदाज म्हणून संघाला गरज आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. अखेर त्याला संघातून वगळण्यात आले. पण हार्दिकने हार मानली नाही, त्याने जबरदस्त पुनरागमन केले आणि सध्याच्या काळातील आपण सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू असल्याचे त्याने सिद्ध केले. पण हार्दिकच्या पुनरागमनाचा फटका शार्दुल ठाकूरला सहन करावा लागल्याचे मत न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिसने व्यक्त केले आहे. (Hardik Pandya vs Shardul Thakur)
स्पोर्ट्स 18 च्या 'स्पोर्ट्स ओव्हर द टॉप' या कार्यक्रमात स्कॉट स्टायरिस बोलत होता. तो म्हणाला, 'शार्दुल ठाकूरचा एक फायदा म्हणजे तो फलंदाजी करू शकतो आणि त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी मॅच-विनिंग इनिंग्सही खेळल्या आहेत. पण त्याच्याकडे धावा करण्याची क्षमता आहे का? चौकार मारायचा की सामना संपवायचा की संघाला मोठ्या टार्गेट पर्यंत पोहचवायचे? त्याच्या क्षमतेबद्दल बोलायचे झाले तर, इथे हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाने त्याचे नक्कीच नुकसान झाले आहे. हार्दिक पंड्याने अष्टपैलू म्हणून जबरदस्त पुनरागमन केले आहे.' (Hardik Pandya vs Shardul Thakur)
स्टायरिस पुढे म्हणाला, 'शार्दुल ठाकूरबाबत बोलायचे झाल्यास तो हार्दिक पंड्यासारखा शानदार खेळाडू नाही. तो अष्टपैलू खेळाडू आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे मला वाटते की तो संघातील त्याचे स्थान निश्चित करण्यासाठी नाही, तर बॅकअप जागेसाठी संघर्ष करत आहे', असेही त्याने मत व्यक्त केले. (Hardik Pandya vs Shardul Thakur)