IPL 2024

IPL 2024 : मुंबई इंडियन्सने विजयासह रचला विक्रम, KKR आणि CSK राहिले मागे

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमधील पहिला सामना अखेर जिंकला आहे. सलग तीन पराभवानंतर हा विजय मिळाला असून तो महत्त्वाचा ठरला आहे. मुंबईला त्यांच्या घरच्या म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता, पण त्याच मैदानावर संघाने सलग पराभवाची मालिका मोडीत काढली. यासह एमआयने एक नवा विक्रम रचला आहे, जो केकेआर आणि सीएसकेसुद्धा आजपर्यंत करू शकलेले नाहीत.

'वानखेडे'वर एमचा 50 वा विजय

रविवारी मुंबईची लढत दिल्ली कॅपिटल्सशी झाली. हा सामना एमआयचे होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला, जो त्यांनी जिंकला. यासह एमआयने आपल्या घरच्या मैदानावर विजयाचे अर्धशतक पूर्ण केले. घरच्या मैदानावर इतके सामने जिंकण्यात यशस्वी झालेला हा एकमेव संघ आहे.

यानंतर KKR आणि CSK चा नंबर

या बाबतीत केकेआर म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआरने कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आयपीएलच्या इतिहासात एकूण 48 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. 5 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने आपल्या होम ग्राउंड चेन्नई चेपॉक स्टेडियमवर आयपीएलमध्ये आतापर्यंत 47 सामने जिंकले आहेत. आरसीबी संघ येथेही मागे पडला आहे. संघाने आपल्या घरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर केवळ 41 सामने जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्स म्हणजेच आरआर संघाने जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर आतापर्यंत 36 सामने जिंकले आहेत.

एमआय संघ गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर पोहोचला

या सामन्यापूर्वी मुंबई संघ आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर होता. मात्र आता संघाने केवळ एकच सामना जिंकला असला तरी संघ दहाव्या स्थानावरून थेट आठव्या स्थानावर पोहोचला आहे. आता तीन संघ आहेत ज्यांचे प्रत्येकी दोन गुण आहेत. मुंबईशिवाय दिल्ली आणि बेंगळुरू यांनीही एक सामना जिंकला आहे. पण नेट रनरेटमुळे मुंबई इंडियन्सचा संघ थेट आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. एमआयचा पुढील सामना आता 11 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आरसीबीशी होणार आहे.

SCROLL FOR NEXT