पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुचर्चित हल्दवानी हिंसाचार प्रकरणाचा सूत्रधार (मास्टर माईंड) अब्दुल मलिक याला उत्तराखंड पोलिसांनी आज (दि. २४) दिल्लीत अटक केली, अशी माहिती पाेलीस महासंचालक निलेश आनंद भरणे यांनी दिली. ८ फेब्रुवारीला हल्दवानी येथील हिंसाचारानंतर अब्दुल मलिक फरार झाला होता. अब्दुल मलिक आणि त्याच्या पत्नीसह सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. हिंसाचारानंतर पोलिसांनी त्याची मालमत्ताही जप्त केली होती.
८ फेब्रुवारी रोजी हल्दवानी येथील बनभूलपुरा भागात मलिकच्या बागेतील अवैध मदरसा आणि धार्मिक स्थळ पाडण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि प्रशासनाच्या पथकावर स्थानिक लोकांनी हल्ला केला होता. दगडफेकीत शहर दंडाधिकारी रिचा सिंग, रामनगर कोतवाल आणि 300 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि महामंडळाचे कर्मचारी जखमी झाले. जमावाने बनभूलपुरा पोलिस स्टेशन जाळले. पोलिस जीप, जेसीबी, फायर इंजिन, दुचाकीसह ७० हून अधिक वाहने पेटवून दिली. अश्रुधुराच्या नळकांड्या आणि लाठीचार्ज करूनही परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तेव्हा जीव वाचवण्यासाठी अधिका-यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिस आणि महापालिकेचे पथक घटनास्थळावरुन निघून गेले. हल्लेखोरांना दिसताच पायात गोळ्या घालण्याचे आदेश प्रशासनाने दिले. या हिंसाचारात पिता-पुत्रासह सहा जणांचा मृत्यू झाला होता.
शासकीय जमीन बळकावणे, मृत व्यक्तीच्या नावाने प्रतिज्ञापत्र देणे, मृत व्यक्तीच्या नावाने न्यायालयात रिट दाखल करणे या प्रकरणी महापालिकेचे सहाय्यक महापालिका आयुक्त गणेश भट्ट यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अब्दुल मलिक, त्याची पत्नी सफिया मलिक यांच्यासह सहा जणांविरुद्ध आयपीसी 417 आणि 120बी कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. 16 फेब्रुवारी रोजी नैनिताल पोलिसांनी अब्दुल मलिकसह नऊ जणांचे पोस्टर जारी केले होते.