ॲड. गुणरत्न सदावर्ते  
Latest

ब्रेकिंग : गुणरत्न सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ

backup backup

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानावर शुक्रवारी करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलीसांनी घरातून उचलून अटक केली होती. त्यांची आज दोन दिवसांची कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीसाठी सरकारी पक्षाकडून प्रदीप घरत यांनी जोरदार युक्तीवाद केला. शरद पवार यांच्या घरावर झालेला हा कट होता असे घरत यांनी न्यायालयात सांगितले. शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला, त्यावेळी नागपुरातून फोन कॉल येत होता, एक व्हॉट्सॲप ग्रुपही तयार करण्यात आला होता. नागपुरातून ज्यांनी फोन केला होता, त्यांचे नाव आम्ही उघड करणार नाही असे सरकारी पक्षाकडून न्यायालयात सांगण्यात आले.

एसटी कर्मचाऱ्यांकडून १ कोटी ८० लाख रुपये वसूल केले गेले, हे पैसे कुठे गेले, कोणत्या ठिकाणी वापरले गेले याबाबत माहिती मिळवणे आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाकडून न्यायालयात नमूद करण्यात आले. सदावर्तेंच्या व्हॉट्सॲपमध्ये बारामतीचा उल्लेख होता, युटूयब चॅनेल्सचा षड्यंत्रात वापर करण्यात आला. एमजेटी या युट्यूब न्यूज चॅनेलचा चंद्रकांत सूर्यवंशी फरार आहे. काही पत्रकारांना हल्ल्यावेळी बोलावलं गेलं अशीही माहिती देण्यात आली.

हा नियोजित कट असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी साक्षीदार शोधण्यासोबत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्याआधारे पोलीस अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वाढीव कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या 109 आंदोलकांनी वरिष्ठ न्यायालयात धाव घेतल्यास, पोलीस त्यांच्या जामीन अर्जाला विरोध करणार आहेत.

भुलाभाई देसाई मार्गावरील 'सिल्व्हर ओक' या शरद पवार यांच्या निवासस्थानात शुक्रवारी दुपारी घुसलेल्या 109 आंदोलनकर्त्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून गावदेवी पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह एकूण 110 जणांना अटक केली आहे. त्यांच्यात 23 महिलांसह 'सिल्व्हर ओक' परिसराची टेहळणी करणार्‍या चौघांचा समावेश आहे.

पोलिसांनी रविवारी सकाळी अ‍ॅड. सदावर्ते यांना लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून गावदेवी पोलीस ठाण्यात नेले. तेथे पोलीस उपायुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांनी रविवारी आझाद मैदान तसेच तेथून 'सिल्व्हर ओक'च्या दिशेने जाणार्‍या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अटक केलेले आंदोलक दिसत असलेले चित्रीकरण पुरावा म्हणून ताब्यात घेतले. त्याआधारे पोलीस अन्य संशयित आरोपी आहेत का, याचाही मागोवा घेत आहेत.

पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल फोनचे तपशील मागवून ते कोणा-कोणाच्या संपर्कात होते, याचीही तपासणी सुरू केली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या 109 आंदोलकांनी सोमवारी जामिनासाठी अर्ज केल्यास पोलिसांकडून विरोध करण्यात येईल. आरोपींना जामिनावर सोडल्यास ते पुन्हा अशाप्रकारचे कृत्य करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात. त्याचप्रमाणे जामिनावर सुटल्यानंतर ते अन्य आरोपींना पळवून लावू शकतात, असा दावा पोलीस करणारत असल्याचे समजते.

पोलिसांनी अ‍ॅड. सदावर्ते यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आझाद मैदानात चिथावणीखोर भाषण केल्याचा पुरावा म्हणून व्हिडीओ रेकॉर्डिंग तसेच आझाद मैदान पोलीस ठाण्यातील पाच अंमलदारांचेही जबाब सादर केले जाणार आहेत.

सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांचा युक्तीवाद

  • आंदोलनात कोणालाही दुखापत करण्याचा हेतू नव्हता
  • कोठडी न देता तपास करू शकतात
  • कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले म्हणता, तशी कोणी तक्रार केली आहे काय?
  • पत्रकारांना बोलावले गेले मग पोलिस बंदोबस्त का नाही
  • तुमची गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली
  • नागपुरातल्या व्यक्तीशी बोलणं झालं हा हवेतला आरोप
  • कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही
  • आंदोलनावेळी दगडफेक झालेली नाही
  • कर्मचाऱ्याकडून पैसे घेतल्याचा पुरावा द्या
  • कर्मचाऱ्यांनी पैसे स्वत: हून दिले होते
  • कोणालाही ईजा झाली नाही तर सदावर्तेंना कोठडी कशासाठी
  • शरद पवारांकडे गेले होतो कारण, त्यांनी हे सरकार बनवले
  • आंदोलनावेळी सदावर्तेचा फोन बंद होता, कारण ते कोर्टात होते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT