पुणे, पुढारी ऑनलाईन: राज्यात सुरु असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदावर रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा ११०४० हजार मतांनी पराभव केला आहे. भाजपच्या पराभवानंतर तब्बल २८ वर्षांपासून ताब्यात असलेला बालेकिल्ला हातातून निसटला आहे. या पराभवानंतर भाजपचे नेते आणि पुण्याचे पालक मंत्री यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
"कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू!" असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अश्विनी जगताप यांचे केले अभिनंदन
चंद्रकांत पाटील यांनी चिंचवड पोटनिवडणुकीत विजयी झाल्याबद्दल अश्विनी जगताप यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, "आजचा अश्विनी जगताप यांचा बलाढ्य विजय हा लक्ष्मण जगताप यांच्या मतदारसंघातील कार्याची पोचपावती आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन अश्विनी जगताप या जनहितासाठी दिवसरात्र झटतील, असा आम्हाला विश्वास आहे, असं देखील पाटील म्हणाले.