पुणे : पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून थेट अतिक्रमणे अन् महावितरणपासून अगदी सुरक्षाव्यवस्थेपर्यंत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्न आणि समस्यांचे लगेचच जागेवर निराकरण करीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडकरांना सुखद धक्का दिला.
आमदार आणि मंत्री म्हणजे नागरिकांची भेट तशी दुर्मीळच, पुण्याचे पालकमंत्री पाटील मात्र यासाठी नेहमीच अपवाद राहिले आहेत. आता तर कोथरूड नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पालकमंत्र्यांनी थेट भेट उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातील तिसर्या टप्प्यातील कार्यक्रम कोथरूड-मधील थोरात गार्डन येथे झाला. उद्योजक समीर पाटील यांनी या उपक्रमाचे संयोजन केले होते. या वेळी उद्यानात येणार्या नागरिकांनी आपल्या तक्रारी पाटील यांच्या समोर मांडल्या.
यात प्रामुख्याने लहान मुलांसाठी बालनाट्याच्या कार्यक्रमाचे आयोजन, उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर उद्यानातील डायनासोर पुन्हा कार्यान्वित करणे, स्वच्छतागृहातील दिवे यांसह टवाळखोर तरुणांचा उपद्रव आदी समस्या मांडल्या. कोल्हापूरच्या धर्तीवर कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या टेरेसवर तारांगण उभारावे, अशी अपेक्षा काही नागरिकांनी व्यक्त केली.
त्यावर पालकमंत्री पाटील यांनी ज्या विभागाशी संबंधित समस्या त्या विभागाच्या अधिकार्यांना तातडीने संपर्क करीत लगेचच सर्व समस्या निवारण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या टेरेसवर तारांगण साकारण्यासाठी आयुक्तांशी चर्चा करून त्याची अंमलबजावणी करू, अशी ग्वाही दिली.
…अन् सुरक्षारक्षकांच्या चेहर्यावर हसू
महापालिकेकडे कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्या काही महिला सुरक्षारक्षकांनी या वेळी पालकमंत्र्यांची भेट घेतली. पाच महिने काम करूनही वेतन झाले नसल्याचे सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी थेट संबंधित ठेकेदाराला कॉल लावला. ठेकेदाराने पालिकेकडून निधी दिला जात नसल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांनी अशा सेवकांची एकूण संख्या किती आहे, याची माहिती घेत सर्वांच्या वेतनाचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचा आदेश देत त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे उपस्थित सेवकांच्या चेहर्यावर हसू फुलले.