नवी दिल्ली : वृत्तसंस्था कशावर जीएसटी लागेल याचा भरवसा नाही, असे विनोदाने म्हटले जाते. मात्र, हा विनोद खरा ठरण्याची चिन्हे आहेत. तुमच्या बँकेच्या पासबुकावरही आता तुम्हाला तब्बल 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काही वस्तू स्वस्त, तर काही वस्तू आणि सेवा महागणार असून 18 जुलैपासून पासबुकवरील जीएसटी देखील अंमलात येईल.
बँक चेकबुक : चेक जारी करण्यासाठी बँकांकडून आकारलेल्या शुल्कावर 18 टक्के जीएसटी आकारला जाईल.
पॅकबंद अन्न : दही, लस्सी, पनीर, मध, गहू आणि मांस (गोठवलेले वगळता) यासारख्या प्री-पॅक खाद्यपदार्थ्यांवर पूर्वी सूट होती. आता त्यावर 5 टक्के जीएसटी लागू होईल.
हॉटेल रुम्स आणि हॉस्पिटल बेडस् : रु. 1,000 प्रतिदिवसापेक्षा कमी दराच्या हॉटेल रूम्सवर 12 टक्के जीएसटी लागू होईल. रु. 5000 प्रतिदिवसपेक्षा अधिक दर असलेल्या रुग्णालयांतील खाटांवर 5 टक्के कर आकारला जाईल (आयसीयू वगळून). म्हणजे उपचार घेणे महाग होणार.
एलईडी लॅम्पस् : एलईडी लाईटस् आणि लॅम्पस् यांच्यावरील कर 12 वरून 18 टक्के करण्यात आला आहे. कटिंग ब्लेड, पेपर चाकू आणि पेन्सिल शार्पनरवर 18 टक्के कर आकारला जाईल.
पंप्स आणि मशिन्स : सायकल पंप, टर्बाईन पंप आणि सबमर्सिबल पंपांवर आता 18 टक्के कर आकारला जाईल. सोलर वॉटर हीटर्सवरही 12 टक्के कर आकारला जाईल. आधी तो 5 टक्के होता.
हेही वाचा