Latest

Kriti Verma : जीएसटी इन्स्पेक्टर ते मॉडेल अन् सध्या सीबीआयच्या रडारवर

दिनेश चोरगे

कृती वर्मा… एक जीएसटी इन्स्पेक्टर… दिसायला अतिशय सुंदर. जीमॅटची परीक्षा देऊन ती जीएसटी खात्यात रुजू झाली. परंतु, तिच्यातील मॉडेलिंग करण्याची उर्मी तिला जीएसटीच्या आकडेवारीच्या विश्वात रमू देईना. तिने आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि अभिनय जगतात करिअर करण्याचे ठरवले. कृतीची ही कृती तिला आता अडचणीत आणणारी ठरणार आहे. सध्या ती तब्बल 264 कोटी रुपयांच्या टीडीएस घोटाळ्यात सीबीआयच्या रडारवर आली आहे. 'सीबीआय'ने तिच्या खात्यात सापडलेले 1.18 कोटी रुपये गोठवले आहेत. 2021 मध्ये गुरुग्राम, (हरियाणा) येथे वर्मा यांच्या नावावर घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी करण्यात आली होती. 'सीबीआय'चा तपास सुरू होताच ही मालमत्ता विकण्यात आली आणि सर्व पैसे अभिनेत्रीच्या बँक खात्यात जमा करण्यात आले, असा आरोप आहे.

फिल्मी करिअर अडचणीत

'टीडीएस' घोटाळाप्रकरणी 'सीबीआय'ने लोणावळा, खंडाळा, कर्जत, पुणे आणि उडुपी येथील अनेक फ्लॅटसह मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यात अभिनेत्री कृती वर्माच्या नावावर असलेल्या संपत्तीचाही समावेश आहे. कृती वर्माने यापूर्वी जीएसटी इन्स्पेक्टर पदावर काम केले आहे. नंतर सरकारी नोकरी सोडून टीव्ही शोमध्ये काम करायला सुरुवात केली. कृती वर्माला एमटीव्ही रोडीज एक्स्ट्रीम आणि बिग बॉस सीझन-12 पासून ओळख मिळाली. सुंदर कृतीच्या आयुष्यात सर्व काही ठीक चालले होते. मात्र, करोडो रुपयांच्या टीडीएस घोटाळ्यात तिचे नाव आल्याने तिच्या फिल्मी करिअरला फटका बसण्याची शक्यता आहे.

डान्स शोमध्ये ओळख

अभिनेत्री कृती वर्मा मूळची दिल्लीची आहे. 2020 च्या शेवटी एका 'डान्स शो' दरम्यान तिची ओळख टीडीएस घोटाळ्यातील आरोपी भूषण पाटील याच्याशी झाली. तिच्या नृत्यावर आणि सौंदर्यावर मोहीत झालेल्या पाटील याने नंतर एक कोटी रुपये तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले. या प्रकाराचा दावा अभिनेत्री कृतीने सीबीआयसमोर केला आहे. 'टीडीएस' घोटाळ्याशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लॉगीन, पासवर्ड वापरायचा

'सीबीआय'ने केलेल्या दाव्यानुसार घोटाळ्याचा 'मास्टरमाईंड' आयटी इन्स्पेक्टर तानाजी मंडल अधिकारी आहे. त्यानेच व्यापारी भूषण पाटील यांच्यासोबत मिळून कोट्यवधीचा घोटाळा केला. तो वरिष्ठांचे लॉगिन आणि पासवर्ड वापरून.

32 ठिकाणची संपत्ती जप्त

ईडीने या प्रकरणात महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून एकूण 32 ठिकाणची संपत्ती जप्त केली आहे. याशिवाय तीन आलिशान मोटारीही जप्त केल्या आहेत. ही मालमत्ता भूषण पाटील, राजेश शेट्टी, सारिका शेट्टी, कृती वर्मा यांच्या नावावर आहेत. ईडीने आतापर्यंत सामुदायिकरीत्या 166 कोटींची संपती जप्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT