बेल्हे, पुढारी वृत्तसेवा: बेल्हे परिसरात पडणार्या दमदार पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. द्राक्ष बागा वाचविण्यासाठी फवारणीसाठी शेतकर्यांना हजारो रुपयांची औषधे खरेदी करावी लागत आहेत. परिसरात परतीच्या पावसाचा आणि ढगाळ हवामानाचा सर्वात जास्त फटका द्राक्ष उत्पादकांना बसणार आहे. पाऊस थांबल्यानंतर 'डावण्या' रोगाचा द्राक्ष बागांवर प्रादुर्भाव होईल, असे मत सुरेश बोरचटे, माऊली शेळके या उत्पादकांनी व्यक्त केले आहे. परिसरात शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार या दिवशी सातत्याने दमदार पाऊस झाला. परिणामी ज्या द्राक्ष बागांची छाटणी झाली तसेच ज्यांची छाटणी सुरू आहे, अशा बागांना धोका निर्माण झाला आहे. रोगराईमुळे द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
काही द्राक्ष बागा लवकर छाटणी झाल्या, त्यांना फुलोरा आला आहे. तो फुलोरा या संततधार पावसाने कुजण्याची शक्यता आहे. बागांवर बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. बागा सध्या पोंगा (कोंब फुटण्याची अवस्था) अवस्थेत आहेत. अशा बागांचे जास्त नुकसान होईल. बागांना पुन्हा पेस्ट करण्याची वेळ येईल असे शेतकरी म्हणाले. सोयाबीन, मका, भाजीपाला, टोमॅटोचेही नुकसान होणार आहे.
द्राक्ष बागांच्या गोड्या बार छाटण्यांना पंधरवड्यापासून सुरुवात झाली आहे. नवीन फुटव्यातून निघालेला द्राक्ष माल जिरण्याचे प्रमाण वाढत असताना गेल्या चार दिवसांपासून बदललेल्या ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे, असे द्राक्ष उत्पादक श्रीप्रकाश बोरा, माऊली शेळके यांनी सांगितले. जुन्नर तालुक्यात 25 हजार हेक्टरवर द्राक्ष बागा आहेत. सध्या ऑक्टोबर छाटणी सुरू आहे. काही ठिकाणी कवळी काडी असल्याने सध्या सुरू असलेला पाऊस व बदललेल्या वातावरणाचा विपरीत परिणाम होऊ शकेल, असे मारुती बोरचटे, बीटी डुंबरे यांनी सांगितले.
बागांना औषध मारण्यासाठी द्राक्ष उत्पादकांची धावपळ सुरू आहे. शेती औषधांच्या दुकानात दिवसाला एक कोटींच्या वर औषधे शेतकरी खरेदी करीत आहेत. तितकीच दुसर्या दिवशीची मागणीही नोंदवली जात आहे. पहिल्या दिवशी झालेल्या पावसानंतर एकाच दिवसात साडेतीन कोटींची औषध विक्री काही दुकानांमध्ये झाली.