Latest

ग्रॅमीत भारताचा डंका

Arun Patil

भारतीय संगीत अभिजात असून ग्रॅमीसारख्या विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांत वेळोवेळी भारतीय संगीतकारांची छाप राहिली आहे. पंडित रविशंकर यांच्यापासून ते गायक शंकर महादेवनपर्यंतच्या वाटचालीत भारतीय संगीतकारांचा बोलबाला राहिला आहे. पाश्चिमात्य संगीताच्या दणदणाटात शास्त्रीय संगीताची झुळूक ही नक्कीच जगाला सुखावणारी ठरली आहे.

संगीत विश्वातील सर्वात प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्काराच्या 66 व्या सोहळ्यात भारताच्या पाच कलाकारांनी आठ पुरस्कारांवर मोहोर उमटविली. या सन्मानाने देशाच्या गौरवात भर पडली आणि देशवासीयांसाठी अभिमानास्पद क्षण राहिला. उस्ताद झाकीर हुसेन हे वयाच्या 72 व्या वर्षी एकाचवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तीन सन्मान पटकावणारे पहिले भारतीय संगीतकार ठरले. ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीत त्यांचा आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'पश्तो' अल्बम विजयी ठरला. राकेश चौरसिया हे दिग्गज बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे. त्याचवेळी 'बेस्ट कंटम्परेरी इंस्ट्रूमेंटल' अल्बमसाठी याच जोडीला 'एज वुई स्पीक' अल्बमसाठी पुरस्कार मिळाला.

भारतीय फ्युजन बँड 'शक्ती'नेही ग्रॅमीवर नाव कोरले. त्याचा प्रारंभ 1973 रोजी ब्रिटनचे गिटारवादक जॉन मॅकलॉघलिनने केला होता. यात भारतीय व्हायोलिनवादक एल. शंकर, तबलावादक झाकीर हुसेन आणि टी.एच. विक्कू 'विनायक राम' यांचा समावेश होता. 45 वर्षांनंतर गेल्या वर्षी जून महिन्यात प्रदर्शित झालेला अल्बम 'धिस मोमेंट'ला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम श्रेणीत पुरस्कार मिळाला. ही बाब कलाकारांचे संगीत प्रेम आणि निष्ठा याचे दर्शन घडवते. सध्या या बँडमध्ये झाकीर हुसेन आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्या व्यतिरिक्त जॉन मॅकलॉघलिन, व्ही. सेल्वागणेश आणि गणेश राजगोपालन यांचा समावेश आहे.

तबलावादक झाकीर हुसेन यांना यापूर्वी ग्रॅमी सन्मान मिळाला आहे; मात्र शंकर महादेवन यांच्या कारकिर्दीतील हा पहिलाच ग्रॅमी पुरस्कार आहे. महादेवन हे केवळ यशस्वी गायक आणि संंगीतकार नाहीत, तर त्यांचा शास्त्रीय संगीताचा प्रचंड अभ्यास आहे. त्यांना लहानपणापासूच संगीतवाद्याचे वेड. एकदा ते आपल्या मामाकडे गेले होते आणि तेथे हार्मोनियम होता. महादेवन यांनी हार्मोनियम वाजवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, महादेवन यांनी संगीताचे कोणतेही धडे घेतलेले नव्हते. त्याचवेळी महादेवन कुटुंबीयांना त्याचे संगीत प्रेम कळून चुकले. शंकर यांचे कुटुंबीय मुंबईला राहत होते. त्यांनी टी. आर. बालमणी यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले. याशिवाय मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे मराठी भावगीत रचना शिकल्या. त्यांना वीणा या वाद्यतंत्राचे कमालीचे वेड.

झुबिन मेहता हे संगीत क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखले जातात. त्यांचे 23 वेळा नामांकन झाले होते आणि त्यापैकी त्यांना पाच वेळेस सन्मान मिळाला. टी. एच. विनायकरम हे दक्षिणेतील मोठे संगीतकार. त्यांना एकदाच ग्रॅमी पुरस्कार मिळाला. विनू विनायकरम यांना झाकीर हुसेन यांच्या समवेतच्या जुगलबंदीमुळे हा सन्मान मिळाला. ए. आर. रेहमान यांना दोनदा ग्रॅमी मिळाला आहे. 'स्लमडॉग मिलेनियर'मधील 'जय हो' या गाण्यासाठी ग्रॅमी मिळाला. निला वासवानी यांना नोबल शांतता सन्मान विजेत्या मलाला युसूफजाई यांचे आत्मचरित्र 'आयएम मलाला' या ऑडिओ बूकच्या कथनासाठी ग्रॅमी मिळाला. 2015 मध्ये मुलांसाठीच्या सर्वोत्तम अल्बमच्या श्रेणीत त्यांना ग्रॅमी मिळाला होता आणि असा सन्मान मिळवणार्‍या त्या एकमेव भारतीय ठरल्या. ग्रॅमी विजेत्यांत फाल्गुनी शहा यांच्याही नावाचा समावेश करता येईल. त्यांना 'अ कलरफुल वर्ल्ड'साठी 2022 मध्ये पहिला ग्रॅमी मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT