कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडून नेमकी कोणी हत्या केली, हे अजूनही तपास यंत्रणांना सांगता येत नाही. त्यामुळे चार्ज फ्रेम निश्चित करण्यापूर्वी त्याचा विचार करणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद संशयित आरोपी डॉ. विरेंद्र तावडे, सचिन अंदुरे यांचे वकील अॅड. विरेंद्र इचलकरंजीकर यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्यासमोर केला. खटल्यातील संशयित समीर गायकवाड याचा डिस्चार्ज अर्ज त्याचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी मंगळवारी मागे घेतला.
कॉ. गोविंद पानसरे खून खटल्याची सुनावणी न्यायाधीश शेळके यांच्यासमोर सुरू आहे. आरोपीचे वकील अॅड. इचलकरंजीकर व अॅड. पटवर्धन यांनी मंगळवारी युक्तिवाद केला. पुढील सुनावणी 25 मार्चला होणार आहे. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे बाजू मांडणार आहेत.
खटल्यातील युक्तिवादानंतर पत्रकारांशी बोलताना अॅड. इचलकरंजीकर म्हणाले, अरुंद रस्त्यावरून पानसरे दाम्पत्य जात असताना बाईकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला.त्यापैकी सांगलीतील समीर गायकवाड याला अटक करण्यात आली. 22 महिने गायकवाड कारागृहात होता. त्यानंतर पुढील वर्षी तपासात गोळीबार करण्यासाठी आलेले दोघे म्हणजे सारंग आकोळकर आणि विनय पोवार होते. त्यांनतरच्या चार्जशिटमध्ये आंदुरेने गोळ्या घालायच्या आणि वासुदेव सूर्यवंशी याने दुचाकी चालवायची ठरले होते, असे संदर्भ आहेत.
साक्षीदाराने सांगितले ते पोलिस मान्य करतात; मात्र एकच मान्य करीत नाहीत, कॉ. पानसरे यांचा खून कोणी केला? पहिल्या टीममध्ये समीर गायकवाड याने केला. दुसरा मारेकरी कोण होता, हे तपास यंत्रणांना माहीत नाही. नंतर दोघेच होते. त्यामध्ये सारंग आकोळकर आणि विनय पोवार होते. आता तिसर्या मुद्द्यात सचिन आंदुरे आणि वासुदेव सूर्यवंशी होता, असे दिसून येते. त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.