देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज सकाळी देहूतील मुख्य मंदिरात संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दर्शनाचा आनंद घेतल्याचे सांगितले. सव्वानऊ वाजता कोश्यारी यांचा ताफा देहूतील मुख्य मंदिरासमोर उभा राहिला. तिथून ते चालत चालत मंदिरात गेले. या मंदिराचे वैशिष्ट्य त्यांनी विचारून घेतले. भाजपचे कार्यकर्ते बाळासाहेब काळोखे, रघुवीर शेलार, उमाशंकर सिंग, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य कैलास पानसरे आदींनी त्यांचा सत्कार केला.
ह भ प नितीन महाराज मोरे, ह भ प संजय महाराज मोरे, यांनी त्यांना द्वारापासून मंदिरात नेले. देऊळ वाड्यात देहूकर दिंडीचा नाद घुमला होता. या सर्वांचे राज्यपाल कोश्यारी यांनी स्वागत केले. कोश्यारी यांना मुख्य मंदिरात नेण्यात आले. मुख्य मंदिरात कोश्यारींच्या हस्ते आरती झाली. इथून कोश्यारी राम-लक्ष्मण मंदिरात गेले. इथे पूजा होऊन नंतर देऊळ वाड्यातील तुकाराम दर्शन हा जीवन चरित्राचा सोहळा त्यांनी पाहिला. मग ते शिळा मंदिरात गेले. शिळा मंदिरात दर्शन घेऊन सभामंडपात आले.
सभा मंडपात त्यांच्यासाठी तुकाराम महाराजांचे हस्तलिखितातील अभंगाचा गाथा ठेवला होता. त्याचे दर्शन राज्यपाल कोश्यारी यांनी घेतले. तिथून पुढे तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. येथे बसून त्यांनी आपला अभिप्राय लिहिला. सभा मंडपाच्या बाहेर येताना पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले तुकाराम महाराजांचे जीवन अगाध आहे. मी आज त्यांचे दर्शन घेऊन सद्गदित झालो आहे. यापेक्षा अधिक न बोलता त्यांनी गाथा मंदिराकडे कूच केले. गाथा मंदिर येथील मंदिर तुकाराम महाराजांचे चरित्र आदी गोष्टी पाहिल्या व त्यांनी राजगुरुनगरच्या दिशेने प्रयाण केले.