नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
ई-कॉमर्स संकेतस्थळांवरील खोट्या प्रतिक्रियांना (रिव्ह्यू) आळा घालण्यासाठी केंद्र सरकार नवीन यंत्रणा विकसित करणार असून, सध्याच्या व्यवस्थेचा आणि जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पद्धतीचा अभ्यास त्यासाठी केला जाईल. ग्राहक व्यवहार विभागाकडून ही व्यवस्था विकसित करण्यात येणार असल्याची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिली.
भारतीय विज्ञापन मानक परिषदेच्या (एएससीआय) सहकार्याने ग्राहक व्यवहार विभागाने ई-कॉमर्स संस्था, ग्राहक मंच, विधी विद्यापीठे, वकील, फिक्की, भारतीय उद्योग महासंघ, ग्राहक हक्क कार्यकर्ते यांसारख्या विविध हितधारकांसोबत ई-कॉमर्स संकेतस्थळांवरील खोट्या प्रतिक्रियांचे (रिव्ह्यू) परिमाण आणि पुढील उपाययोजनांसंबंधी नुकतीच चर्चा केली आहे.
ई-कॉमर्समध्ये उत्पादन वस्तू प्रत्यक्ष पाहण्याची किंवा तपासण्याची कोणतीही सोय नसून केवळ आभासी खरेदी असल्यामुळे ज्या वापरकर्त्यांनी यापूर्वी या वस्तू किंवा सेवा खरेदी केल्या आहेत, त्यांची मते आणि अनुभव पाहण्यासाठी ग्राहक ई-कॉमर्स मंचावर नोंदवण्यात आलेल्या प्रतिक्रियांवर (रिव्ह्यू) मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात.अशात खोट्या प्रतिक्रियांच्या समस्येवर कायदेशीर चौकट विकसित करण्यावर मंत्रालयाचा भर असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा :