सॅन फ्रान्सिस्को; वृत्तसंस्था : पासवर्डमुक्त इंटरनेटच्या दिशेने गुगलने पाऊल टाकले असून, आता गुगल आणि गुगलच्या सेवा वापरणार्यांना किचकट पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही. त्याजागी अत्यंत सोपा असा 'पास की'चा पर्याय देण्यात आला असून, त्यायोगे अकाऊंट हॅक होणे, फिशिंग, स्कॅमिंगपासून वापरकर्त्यांची सुटका होणार आहे.
बुधवारी जागतिक पासवर्ड दिवस होता. त्याच दिवसाचे औचित्य साधत गुगलने पासवर्डच्या अंताचा प्रारंभ केला. 'पास की' ही नवी यंत्रणा जगभर कार्यान्वित झाली आहे. यामुळे पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या झंझटातून सुटका तर होणारच आहे; पण हॅकिंग आणि फसवणुकीच्या घटनांनाही चाप बसणार आहे.
पासवर्ड कितीही अवघड तयार केला, तरी तो शोधून हॅक करता येतो; पण 'पास की' हा नवीन प्रकार बायोमेट्रिकचा वापर करून तयार करता येतो. त्यात फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा स्क्रीन लॉक पिनचा समावेश आहे. या 'पास की' यंत्रणेमुळे गुगल अकाऊंट व इतर सर्व गुगल सेवांचा वापर करणे आणखी सोपे होणार आहे.
प्रत्येक जण गुगलचा वापर करतो. फोनमध्ये गुगल अकाऊंटनेच लॉग इन केले जाते. तसेच यूट्यूब, जी-मेल, बँकांचे अॅप्स यासाठी गुगलचे अकाऊंट वापरले जाते. त्यामुळे फोन हॅक झाला किंवा फिशिंगसारखा प्रकार झाला तर सारेच हातून जाते. अशा स्थितीत पासवर्डच बाद करून त्याऐवजी बायोमेट्रिक आधारित 'पास की' वापरल्याने बाहेरून हस्तक्षेप बंदच होणार आहे.