गोल्डन रॉड (Golden Rod) या फुलाच्या नावातच गोल्ड म्हणजे सोने दडलेले आहे. नावाप्रमाणेच या फुलांना बाजारात नेहमी मागणी असते. शिवाय वर्षाचे बारा महिने हे पीक घेता येते. त्यामुळे या पिकाला नेहमीच सुवर्णझळाळी असते.
गोल्डन रॉड (Golden Rod) गोल्डन शॉवर किंवा सॅलिडँगो डेझी किंवा सोनतुुरा नावांनी ओळखले जाते. फुलांचा आकर्षक पिवळा रंग, झुपकेदारपणा, लांब आणि सरळ दांडा या सर्व गोष्टींमुळे पुष्परनेतही या फुलांनी मानाचे स्थान पटकवले आहे. फुलांच्या या दांड्यांना वर्षभर मागणी असते. ही वनस्पती बहुवर्षीय असल्याने वर्षभर फुलांचा सातत्याने पुरवठा करणे शक्य आहे. एकदा लागवड केल्यावर तीन ते पाच वर्षे त्याच जागेवर फुलांचे उत्पादन घेता येते. आपल्याकडे याची लागवड वर्षभरात केव्हाही करता येते.
लागवडीसाठी हलकी ते मध्यम उत्तम निचर्याची सुपीक जमीन स्वच्छ करावी. त्यानंतर जमिनीची आडवी उभी नांगरट करून ढेकळे फोडून कुळवणी करावी. जमीन तयार झाल्यावर साधारणपणे 25-30 बैलगाड्या शेणखत मातीत मिसळावे. त्यानंतर 3 बाय 1 मी. आकाराचे सपाट वाफे तयार करून 50 बाय 50 सें. मी. 30 बाय 30 सें. मी. अंतरावर लागवड करावी. गोल्डन रॉडची (Golden Rod) लागवड जुन्या झाडांना फुटलेल्या फुटव्यांपासून करतात. प्रत्येक झाडाभोवती पाच ते दहा फुटवे असतात ते वेगळे करून लागवड केली जाते.
हिवाळ्यात 8-10 दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यांत 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पिकास पाणी द्यावे. जास्त दाट लागवड केल्यास कालांतराने फुटव्याची दाटी होते आणि रोेपे व्यवस्थित वाढत नाहीत. ही कणखर वनस्पती असल्यामुळे फारशी निगा राखावी लागत नाही. सुरुवातीला तण काढून शेत तणविरहित ठेवावे. काही दिवसांनी रोपे वाढून सर्व जागा व्यापते आणि त्यामुळे तण फारसे वाढत नाही. मात्र रोपांभोवती येणारे मुनवे वेळो-वेळी काढावेत. कमीत कमी 1 ते 2 मुनवे वाढू द्यावेत.
रोपांच्या (Golden Rod) चांगल्या वाढीसाठी माती परिक्षणानुसार दरवर्षी हेक्टरी 80 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. नत्र दोन समान हप्त्यात विभागून द्यावे.
साधारणपणे लागवडीनंतर 45 ते 50 दिवसानंतर फुले येण्यास सुरुवात होते. त्यानंतर फुले सुरू राहतात. दांडीवरील खालच्या भागातील फुले उमलण्यास सुरुवात झाली की, असे तुरे लांब दांडीसह तोडावेत. दांडा जमिनीपासून खोडावर तीन ते चार डोळे ठेवून तोडावा.
काढणीनंतर लांबीनुसार 10 किंवा 12 दांडे जुडीच्या स्वरूपात वेगवेगळे बांधावेत. असे 50-100 बंंडल एकत्र बांधून ओल्या गोणपाटात गुंडाळून बाजारपेठेत पाठवावेत. कमीत कमी खर्च, हमखास बाजारपेठ, विविध हंगामात विविध ठिकाणी करता येणारी लागवड, तसेच रोग आणि कीडींचा या पिकावर विशेेेष प्रार्दुभाव नसल्यामुळे गोल्डन रॉडची (Golden Rod) लागवड फायदेशीर ठरते.
– विठ्ठल जरांडे
हेही वाचा :