हैदराबाद, पुढारी ऑनलाईन : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सुदानहून शारजाहमार्गे आलेल्या 23 महिला प्रवाशांकडून 7.89 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. बुधवारी विमानतळावर सर्व महिला आणि त्यांच्या सामानाची झडती घेतली असता एकूण 14,906.3 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. यामध्ये 14,415 ग्रॅम 22 कॅरेट आणि 491 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा समावेश आहे.
वेगवेगळ्या प्रवाशांकडून जप्त केलेल्या प्रमाणाच्या आधारे, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांनी बुटांमध्ये सोन्याचे दागिने लपवले होते. यापूर्वी 11 जानेवारी रोजी दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून कस्टम अधिकाऱ्यांनी 33.57 लाख रुपये किमतीचे 583.11 ग्रॅम सोने जप्त केले होते.
दुसरीकडे, 6 जानेवारी रोजी दुबईहून आलेल्या चार प्रवाशांकडून 77.02 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते. वृत्तानुसार, एका दिवसापूर्वी दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 27.78 लाख रुपयांचे सोने जप्त केले होते. याशिवाय 1 जानेवारी रोजी दुबईहून येणाऱ्या प्रवाशाकडून 16 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते.