Latest

Kashmir saffron honey : काश्मिरी केसर मधाला सोन्याचा भाव!

backup backup

कोरोना काळात लागू केलेल्या सक्तीच्या लॉकडाऊनमुळे माणसाचे मोठे नुकसान झाले असले, तरी त्या काळात निसर्ग प्रदूषणशून्य झाल्याने मधमाश्यांनी चौपट वेगाने परागीकरण केले. साहजिकच, मधाचे विक्रमी संकलन झाले. याच काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नागरिकांनी कोट्यवधी रुपयांचा मध फस्त केला. त्यामुळे यंदा प्रथमच कश्मीरमधील केसरापासून तयार झालेल्या मधाची मागणी वाढली असून, तो मध सध्या दोन हजार रुपये किलो भावाने विकला जात आहे. (Kashmir saffron honey)

जगभरात कोरोना हाहाकार घालत असताना इकडे निसर्गात मात्र लॉकडाऊनमुळे मोठे सकारात्मक बदल दिसून आले. वाहतुकीचा प्रचंड गोंगाटच थांबलेला असताना मधमाश्यांच्या परागीकरणाचा वेग चार पटींनी वाढला. भारतातही तेच परिणाम दिसून आले आणि गेल्या वर्षभरात मधाचे विक्रमी उत्पादन झाले. मधाचे आयुर्वेदिक महत्त्व असल्याने कोरोना काळात मधाची मागणी अनेक पटींनी वाढल्याने त्याला सोन्याचा भाव आला. पुण्यात देशातीलच नव्हे, तर आशिया खंडातील सर्वात मोठे 'हनी पार्लर' आहे. येथे याबाबत सर्व प्रकारचे प्रशिक्षण कोणाही जिज्ञासूला घेता येते.

Kashmir saffron honey : रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा हुकमी एक्का!

कोरोनाच्या महामारीनंतर प्रत्येकजण रोगप्रतिकारक शक्ती कशाने वाढेल, याचा अभ्यास करत होता. यात आवळा, अंडी आणि मध याचे प्रामुख्याने सेवन केले जात होते. कोरोना काळात देशातील नागरिकांनी सर्वात जास्त काय खरेदी केले असेल, तर तो मध! याच काळात अनेकांना समजले की, मधाचेही अनेक प्रकार असतात. आतापर्यंत अडीचशे ते तीनशे रुपये किलो दराने मध खरेदी केला जात होता. आले, लवंग, दालचिनी, इलायची, वेलदोडा यांच्या काढ्याने रोगप्रतिकारक शक्ती जशी वाढते, त्याच गतीने उच्च दर्जाच्या मधामुळेही रोगप्रतिकारक शक्ती वाढते. (Gold price for Kashmiri saffron honey)

आता 'रॉयल जेली'ची निर्मिती

या संस्थेने रॉयल जेली उत्पादनाची तयारी आणि जतन तंत्रज्ञानाचा प्रसार हा प्रकल्प सुरू केला. डॉ. लक्ष्मी राव या प्रकल्पाच्या समन्वयक आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपला देश आतापर्यंत तैवान आणि थायलंड येथून रॉयल जेली आयात करीत होता. कारण, इथे त्याचे कोणतेही उत्पादन घेतले जात नव्हते. मात्र, या प्रकल्पामुळे हे साध्य करता आले आणि अर्थातच मधमाश्या पालन करणार्‍यांनाही त्याचा फायदा मिळाला.

मधाचा भाव चारशे ते दोन हजार रुपये किलो

अनेक फुलांपासून निर्माण झालेला मल्टिफ्लोरा मध 400 रुपये किलो, तर कश्मीरमधील केसरच्या झाडाला लागलेल्या पोळीतून तयार झालेला मध आणि हिमालय व मेळघाटामधील मध (ऑरगॅनिक हिमालयीन माऊंटेन हर्बल व ऑरगॅनिक अ‍ॅकेसिया हिमालयीन मध) 2000 रुपये किलो असा विकला जात आहे.

देशातील पहिलेच मधुमक्षिका केंद्र पुण्यात

खादी व ग्रामोद्योग आयोगाने केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने शास्त्रीय अभ्यासाला आणि तंत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पुणे शहरातील शिवाजीनगर येथे केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे लक्ष मधमाश्या पालन तसेच त्यांच्या संशोधन आणि प्रशिक्षणाला बळकटी देणे होते. पुण्यासह मधमाश्या पालनाचे तंत्र शिकवणारी राज्यात 19 विस्तार केंद्रे तयार केली गेली.

मधमाश्यांचा जेव्हा जन्म होतो, तेव्हा त्यांच्या डोक्यातून फॅरिंजियल ग्रंथीतून स्राव स्रवतो. त्याचा रंग दुधासारखा पांढरा असतो. कष्टकरी मधमाश्यांतून एक ते तीन दिवस, तर राणी माशीतून हा स्राव 16 दिवस सुरू असतो. यापासून राजान्य (रॉयल जेली) तयार केली जाते. ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असून, त्वचा सौंदर्य वाढवते.
– सुनील पोकरे,
सहायक संचालक,
मधुमक्षिका पालन केंद्र, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT