पिंपरी : पिंपळे सौदागर पोलिस चौकी परिसरातील महादेव मंदिरासमोर मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिक्षिकेची अडीच तोळे वजन असलेली एक लाख वीस हजार रूपये किंमतीची सोनसाखळी चोरीला गेली आहे. ही घटना शनिवारी (18 रोजी) पहाटे पावणेसहा वाजता घडली आहे. शहरात सतत साखळी चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. पोलिस चौकीजवळच चोरी करण्याची हिंमत या भुरट्या चोरांची वाढली आहे. जणू यांना पोलिसांचाही धाक उरला नाही.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिक्षिकेची अडीच तोळे वजनाची एक लाख वीस हजार रूपये किंमतीची सोनसाखळी मोपेडवरून ट्रिपलसीट आलेल्या चोरांनी हिसका देऊन पळवून नेली आहे. या विरोधात महिला फिर्यादीने शनिवारी (18 रोजी) सकाळी अकरा वाजता सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. तसेच सीसीटिव्हीमध्ये या घटनेचे दृष्य टिपण्यात आले अहे.