पुणे; पुढारी वृत्तसेवा : बनावट सोने देऊन खरे सोन्याचे दागिने खरेदी करणार्या महिलेला खडक पोलिसांनी अटक केली. साक्षी अविनाश सोनी (वय 32, रा. शेठ प्रेमजी जीवन सेनोटेरियम धर्मशाळा, पुणे स्टेशन) असे तिचे नाव आहे. सराफांनी दाखविलेले प्रसंगावधान अन् खडक पोलिसांच्या तत्परतेमुळे ही महिला गजाआड झाली. हॉलमार्क असलेली सोनसाखळी घेऊन ती पेढीत आली होती. जुने सोने देऊन तिने दुसरा दागिना पसंत केला. हॉलमार्क असल्याने त्यावर विश्वास ठेवून सराफाने तिला नवीन दागिना दिला.
प्रत्यक्षात मात्र तो बनावट निघाला. अशाच प्रकारे इतर सराफांनाही तिने फसविल्याचे लक्षात आले. हा प्रकार व्हॉट्सअॅपमार्फत सर्व सराफांपर्यंत पोहोचविला गेला होता. अशाच प्रकारे फसवणूक करण्यासाठी ती पुन्हा कस्तुरे चौकातील एका सराफी दुकानात गेली होती. याबाबत गणेश पेठेतील एका सराफाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कस्तुरे चौकात सराफ दुकान आहे. त्यांच्या व्हॉट्सअॅपवर सराफांच्या ग्रुपवर दोन महिन्यांपूर्वी एक महिला बनावट दागिने देऊन नवे दागिने घेऊन जात असल्याचे सांगितले होते. ही महिला शनिवारी त्यांच्या दुकानात पुन्हा आली. बनावट चेन देऊन तिला सोन्याचे मंगळसूत्र खरेदी करायचे होते. फिर्यादी यांना हा प्रकार लक्षात आला.
त्यांनी या महिलेला बोलण्यात गुंतवले. त्या सोनसाखळीचा तुकडा टेस्टिंगला पाठविला. तेव्हा टेस्टिंगचा रिपोर्ट 22 कॅरेट येणे अपेक्षित असताना केवळ 5 कॅरेट आला. तिने तांब्याच्या तारेवर सोन्याचा मुलामा दिला असल्याचे आढळून आले. त्यांनी पोलिसांना सावध केले. पोलिसांनी तातडीने या सराफाचे दुकान गाठून महिलेला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक राहुल जोग तपास करीत आहे.