वास्को; पुढारी वृत्तसेवा : शहरातील भटक्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने गोमंतक गोसेवक महासंघ गोवासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे भटकी गुरे मुक्त पालिका क्षेत्र होण्यास मदत होणार असल्याचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज यांनी सांगितले. या गुरांना पकडून सिकेरी मये येथील गोमंतक गोसेवक महासंघाच्या जागेत ठेवण्यात येणार आहे. तेथे त्यांची योग्य काळजी घेण्यात येईल, असे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले.
येथे भटक्या गुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या भटक्या गुरांचा बंदोबस्त करावा, यासाठी पालिकेकडे सतत तक्रारी येत होत्या. या भटक्या गुरांमुळे काहीजणांना अपघात झाले होते. यातील काहीजणांना प्राण गमवावे लागले होते. याप्रकरणी दखल घेताना मंत्री नीळकंठ हळदणकर यांनीही पालिकेने भटक्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलावीत, असे आवाहन केले होते.