गोवा

राजधानी पणजीत सर्वाधिक हवा प्रदूषण; नऊ प्रदूषित ठिकाणे धोकादायक

दिनेश चोरगे

पणजी; पिनाक कल्लोळी :  राज्यातील नऊ ठिकाणचे वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी राज्यसभेत केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विन कुमार चौबे यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. याबाबत खासदार कुमार केतकर यांनी अतारांकित प्रश्न विचारला होता. वरील ठिकाणी हवेतील 'पीएम 10' कणांची वार्षिक सरासरी मर्यादा निर्धारीत 60 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर पेक्षा जास्त आहे.

राज्यधानी पणजी शहर सर्वाधिक प्रदूषित आहे. येथे 'पीएम 10' चे वार्षिक प्रमाण 73 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आहे. म्हापसामध्ये हेच प्रमाण सर्वात कमी म्हणजे 57 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आहे. सांगे येथे हेच प्रमाण काठावर म्हणजे 60 आहे. आमोणे, मडगाव, तुये येथे 59, अस्नोडा आणि वास्को येथे 58 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आहे. असे असले तरी देशाच्या अन्य शहरांच्या तुलनेत राज्यातील प्रदूषण कमी आहे. उत्तरात देशातील एकूण 389 ठिकाणांची आकडेवारी देण्यात आली आहे. यामध्ये कमी प्रदूषणाच्या क्रमवारीत म्हापसा 87 व्या, वास्को 91 व्या तर राजधानी पणजी 159 व्या स्थानी आहे. मिझोराम येथील कोलसीब येथे 'पीएम 10' कणांची वार्षिक प्रमाण देशातील सर्वात कमी म्हणजेच 17 तर हरियाणातील सोनिपत येथे सर्वाधिक 319 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आहे.

'पीएम 10' मुळे आरोग्यास धोका

ज्या प्रदूषण कणाचा व्यास 10 मायक्रॉन किंवा त्यापेक्षा कमी असतो त्यांना पीएम 10 म्हटले जाते. यामध्ये प्रामुख्याने धूळ, धूर, काजळी, रसायने आणि धातूंच्या सूक्ष्म कणांचा समावेश असतो. या कणांचे हवेतील प्रमाण वाढल्यास डोळे, घसा, नाक आणि फुफ्फुसाला त्रास होऊ शकतो. यामुळे अस्थमा, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे असे आजारही होऊ शकतात.

ही आहेत धोकादायक गावे…

राज्यातील नऊ ठिकाणी वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. पणजी, कुंकळळी, उसगाव-पाळी, फोंडा, कोडली, कुंडई, तिळामळ, होंडा, आणि डिचोली येथे हवेतील 'पीएम 10' या प्रदूषण कणांचे प्रमाण मर्यादेबाहेर आहे.

SCROLL FOR NEXT