गोवा

मडगाव ः नगराध्यक्ष निवडीत भाजपची भूमिका निर्णायक;कामत गटातील नगरसेवकांना सरदेसाई गटाचाच विरोध

अनुराधा कोरवी

मडगाव ः पुढारी वृत्तसेवा येथील नगरपालिकेचे तत्कालिन नगराध्यक्ष लिंडन परेरा यांचा राजीनामा पालिका संचालकांनी मंजूर केल्यामुळे आमदार दिगंबर कामत यांच्या गटासाठी नगराध्यक्षपदाची दारे उघडी झाली आहेत. दिगंबर कामत मडगावात नसल्याने त्यांच्या गटातील कोणाच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या गटातील काही नगरसेवकांना आमदार विजय सरदेसाई गटातील नगरसेवकांचा विरोध असल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप गट महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोमवारी लिंडन परेरा यांचा राजीनामा पालिका संचालनालयाकडून स्वीकारण्यात आला. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा अतिरिक्त ताबा उपनगराध्यक्षा दीपाली सावळ यांच्यांकडे गेला आहे. दिगंबर कामत आणि विजय सरदेसाई यांच्यात झालेल्या अलिखित करारानुसार आता कामत यांच्या गटातील नगरसेवकाच्या गळ्यात पुढिल पंधरा महिन्यांसाठी नगराध्यक्ष पदाची माळ पडणार आहे. कामत यांचे अनेक नगरसेवक गुडग्याला बाशिंग बांधून तयार आहेत; पण सध्या कामत राज्यात बाहेर असल्याने त्यांच्या गटातील कोणत्या नगरसेवकाला नगराध्यक्षपदाची लॉटरी लागणार हे कामत गोव्यात परतल्यावरच स्पष्ट होणार आहे.

पालिकेतील एकूण नगरसेवकांची संख्या पंचवीस आहे. त्यापैकी भाजपाकडे नऊ, विजय सरदेसाई यांच्या फातोर्डा फॉरवर्ड गटाकडे आठ, दिगंबर कामत यांच्या मॉडेल मडगाव गटाकडे सात आणि घनश्याम शिरोडकर हे अपक्ष नगरसेवक यांचा समावेश आहे. भाजपाकडे नऊ नगरसेवक असल्याने कामत यांना बिनविरोध नगराध्यक्ष निवडून आणणे शक्य नाही. कामत यांच्या गटातील काही नगरसेवकांना विजय यांच्या गटातील नगरसेवकांचा विरोध आहे. उमेदवाराला नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी तेरा नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. नगरसेवकांमाधील अंतर्गत वादामुळे बहुमत सिद्ध करणे आव्हानात्मक बनू शकते त्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांशी जवळीक साधण्याचे जोरदार प्रयत्न इच्छुक नगरसेवकांनी सुरू केले आहेत.

भाजपची रणनीती ठरणार उमेदवारावर

भाजपाच्या एका पदाधिकार्‍याने नगराध्यक्ष निवडीच्या अधिसूचनेबरोबर कामत कोणाला नगराध्यक्ष पदासाठी उभे करणार यावर भाजपाचे पुढील खेळी अवलंबून असल्याचे सांगितले. चार नगरसेवक आमच्या संपर्कात होते; पण त्यांच्या मागण्या फार असल्याने आम्ही त्यांना भाजपात घेण्याचा प्रस्ताव तात्पुरता पुढे ढकलला आहे. भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभा करावा की दुसर्‍या उमेदवाराला समर्थन द्यावे हे कामत यांनी आपला उमेदवार उभा केल्यानंतरच ठरवले जाईल, अशी माहिती नाव उघड न करण्याच्या अटीवर त्यांनी दिली.

एकूण नगरसेवक 25

विजय सरदेसाई यांच्या फातोर्डा फॉरवर्ड गटाकडे आठ

दिगंबर कामत यांच्या मॉडेल मडगाव गटाकडे सात

भाजपाकडे नऊ

घनश्याम शिरोडकर हे एकमेव अपक्ष नगरसेवक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT