गोवा

भयंकरच; गोव्यातील पर्यटकांच्या जीवाशी खेळ; पाच बोटी जप्त

अनुराधा कोरवी

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा ; गोव्याला जागतिक पर्यटनाची राजधानी करण्याचा संकल्प राज्य सरकारसह पर्यटनाशी संबंधित नानाविध संस्था, संघटना करतात. या पार्श्वभूमीवर वास्तवात मात्र पर्यटनातील बेशिस्त, गैरप्रकार, भ्रष्टाचार वारंवार उघड होत असतात. शनिवारी तर पर्यटकांच्या जीवाशी केलेला खेळ उघडकीस आला. जलसफरी करणाऱ्या पाच प्रवासी बोटी जप्त करण्यात आल्या. बंदर कप्तान खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. सिकेरी कांदोळी येथे कमी वेळेत अतिपैसे मिळवण्याच्या लालसेपोटी या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांना बसवलेले होते.

गंभीर बाब म्हणजे प्रवाशांच्या पर्यायाने पर्यटकांच्या जलसफरी करण्याचा कोणताही परवाना या बोट चालकांकडे नव्हता. दोन दिवसांपूर्वी दोनापावला येथील समुद्रात एक प्रवासी बोट बुडाली होती, ती प्रवासी बोटही विनापरवाना होती. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जलसफर करीत असताना ती बोट बुडाली. या पार्श्वभूमीवर तसेच आलेल्या तक्रारीनंतर बंदर कप्तान खात्याने सिकेरी कांदोळी येथील किनाऱ्यावर जलसफरीचा व्यवसाय करणाऱ्या अशा बोटींवर कारवाईचा बडगा उगारला.

मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या बोटी या एकाच मालकाच्या असून तो परदेशात राहतो. या बोटीवर चालक म्हणून काम करणाऱ्यांकडे चालकाचा परवानाही नव्हता. सध्या पर्यटन हंगाम असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात येतात व जलसफरीचा आनंद लुटतात. याचाच फायदा हे ऑपरेटर्स उठवतात आणि पर्यटकांच्या जीवाशी खेळतात. एकमेकांशी स्पर्धा करताना मर्यादेपेक्षा जास्त पर्यटक बोटीत घेऊन जलसफर करतात.

प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे, नियम न पाळणे, परवान्याशिवाय वाहतूक करणे आदी गुन्हे बोट चालकांवर दाखल उत्तर गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर जलक्रीडा उपक्रमांशी संबंधित या बेकायदेशीर प्रकारावर बंदर कप्तान खात्याचे अधिकारी कारवाई करीत राहतील, असे बंदर कप्तान खात्याने म्हटले आहे.

तपासणी, कारवाई सतत करा

ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष नीलेश शहा म्हणाले. किनारी भागात अनेक बेकायदेशीर गोष्टी होतात. गोवा लहान असल्याने ओळखीने या गोष्टी होत असतात. जलक्रीडेच्या नावाखाली पर्यटकांच्या जीवाशी खेळले जाते. क्षमतेपेक्षा जास्त लोकाना बसवून समुद्र सहल केली जाते. हे पर्यटकांच्या जीवाला फारच धोकादायक आहे. पर्यटकांच्या सुरक्षेला महत्त्व हवेच. दोन दिवसांपूर्वी दोनापावला येथे एक बोट बुडाली. नशिबाने कुणी बुडाले नाही. मात्र दुर्घटना घडण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणांनी एकदाच कारवाई करून थांबू नये. सतत पाहणी करून कारवाई चालू ठेवली तरच असे गैरप्रकार कमी थांबतील…

अजब कारभाराचा गजब नमुना

कांदोळीचे सरपंच फेरमिनो फर्नांडिस यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी या • ठिकाणी जलसफरी करणाऱ्या बोटींची संख्या तीस ते पस्तीस होती; पण आता त्यात प्रचंड वाढ झाली असून ती दीडशे ते दोनशेच्या आसपास झालेली आहे. त्यावेळी काही अवघे ऑपरेटर्स हा व्यवसाय करीत होते आणि पंचायतीकडे त्याची नोंदही होत असे. परंतु, सध्या पंचायतीचा या व्यवसायाची काही संबंध नाही. संपूर्ण जबाबदारी बंदर कप्तान खात्याची आहे.

बोट चालवण्याकरिता चालकाचा परवाना तसेच पोहता येणे गरजेचे असते; परंतु या व्यवसायात काम करणारे बहुतेक सर्व कामगार बिगर गोमंतकीय असतात. ते प्रशिक्षण घेतलेले नसतात. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वर्षांपूर्वी बागा येथे अशीच दुर्घटना घडली होती. त्यानंतर काही काळाकरिता तेथील जलसफरीचा व्यवसाय बंद केला होता. या खात्याने सर्वच ठिकाणी अशी वारंवार छापे टाकून तपासणी करणे गरजेचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT