फोंडा : पुढारी वृत्तसेवा; राज्यातील वाढते अपघात चिंतेची बाब ठरली असून फोंडा तालुक्यातील बहुतांश धोकादायक ठिकाणी तर सातत्याने अपघात झाल्याने काहीजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेषतः फोंड्यातील ढवळी – बायथाखोल भाग अपघातांचे केंद्रस्थान बनले आहे. त्याशिवाय कुर्टी – खांडेपार आणि फर्मागुढी प्रियोळ परिसरात सातत्याने अपघात होत आहेत. या तिन्ही महत्त्वाच्या मार्गांवरील अपघातांची मालिका काही खंडित झालेली नाही, उलट ती वाढतच चालली आहे.
ढवळी – बायथाखोल बोरी भागात मागच्या सहा महिन्यात या ठिकाणी आठ अपघात झाले आहेत. त्यातील एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या आठ अपघातांसह अन्य काही अपघातात वाहनचालक किंवा प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी या मार्गावर अपघातांचे सातत्य असल्याने तो चिंतेचा विषय ठरला आहे. अन्य किरकोळ अपघात तर सुरूच आहेत.
फर्मागुढी ते प्रियोळ मार्गावरही मागच्या सहा महिन्यात किरकोळ सोडल्यास बारा अपघात झाले आहेत. त्यातील दोघाजणांना आपले जीव गमवावे लागले तर कुर्टी – खांडेपार मार्गावर तर अपघातांचे सातत्य कायम आहे. या ठिकाणी गेल्या सहा महिन्यात सुदैवाने एकही जीवितहानी झाली नसली तरी अपघातांचे सत्र सुरूच आहे आणि या ठिकाणी झालेल्या अपघातांची संख्याही मोठी
आहे.
फोंडा हा राज्यातील मध्यवर्ती भाग असून या महामार्गांवर वाहनांची कायम वर्दळ सुरू असते. विशेषतः या मार्गावर अवजड मालाची वाहतूक करणार्या वाहनांची संख्या फार मोठी आहे. फोंडा तालुक्यात कुंडई, मडकई आणि बेतोडा अशा तीन औद्योगिक वसाहती असल्याने तसेच जवळच खोर्ली औद्योगिक असल्याने या मार्गावर वाहतूक करणार्या अवजड विशेषतः दहाचाकी वाहनांची संख्या फार मोठी आहे.
फोंडा तालुक्यात बर्याच ठिकाणी बगल रस्ते उभारण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणच्या रस्त्यांचे रुंदीकरण अद्याप झाले नसल्याने वाढत्या वाहनांची सुरळीत वाहतूक होण्यास अडचणी येत आहेत. कुर्टी – खांडेपार हा चौपदरी रस्ता झाला असला तरी सध्या ढवळी ते बोरी व फर्मागुढी ते म्हार्दोळपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण बाकी आहे. त्यामुळे वाढणार्या वाहनांच्या संख्येला हे अरुंद रस्ते धोकादायक ठरत असल्याने चौपदरी रस्त्यांच्या कामाला त्वरित सुरुवात होण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
फोंडा शहर हे राज्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. पूर्वी बगल रस्ते नसल्याने भर शहरातून सर्व वाहतूक केली जायची. मात्र फोंड्याचे विद्यमान आमदार व कृषीमंत्री यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत फोंड्याला मध्यवर्ती ठेवून फर्मागुढी, कुर्टी व ढवळी येथून बगल रस्ते उभारले. त्यामुळे सुरळीत वाहतुकीला बर्याच अंशी वाव मिळाला. अन्यथा शहरातील वाहतुकीचा ताण वाढून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली असती.
राज्यातील बेळगाव ते पणजी चौपदरी रस्त्याचे काम अजून बर्याच ठिकाणी शिल्लक आहे. कुर्टी ते खांडेपार रस्त्याचे चौपदरी काम पूर्ण झाले आहे. कुर्टी ते ढवळीपर्यंतही चौपदरी रस्ता झाला आहे, मात्र ढवळी ते बोरीपर्यंतचा रस्ताकाम अडून पडले आहे. बोरीत रस्त्यालगतच लोकवस्ती व घरे असल्याने हा चौपदरी रस्ता सध्याचा रस्ता सोडून अन्यत्र ठिकाणाहून केला जाणार आहे, मात्र या कामाला सुरवात झालेली नाही. याशिवाय फर्मागुढी ते म्हार्दोळ व पुढे कुंडई ते भोम – बाणस्तारीपर्यंतचा रस्ता करायचा शिल्लक आहे. सध्याच्या अरुंद रस्त्यांमुळेच अपघातांची मालिका सुरू आहे.
ढवळी ते बोरीपर्यंतच्या रस्त्याचे काम अडलेले आहे. शिवाय बोरीला नवीन पुलाची आवश्यकता आहे. त्यामुळेच ढवळी ते थेट बोरी नवीन पुलापर्यंतच्या रस्ता कामाला चालना द्यायला हवी. गोव्यात वाहनांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब आहे. एका माणसाकडे दोन वाहने असे समीकरण होत असल्याने रस्ते कमी आणि वाहने जास्त असा प्रकार झाला असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
– जयंत नारायण सीमेपुरुषकर ढवळी दरीफर्मागुढी ते प्रियोळ व पुढे म्हार्दोळपर्यंतच्या चौपदरी रस्त्याला चालना देण्याची आवश्यकता आहे. वाढत्या वाहनांमुळे या ठिकाणी कायम अपघात होत असून वेडीवाकडी वळणे, एका बाजूला डोंगर तर दुसर्या बाजूला दरी त्यातच रस्ता अरुंद यामुळेच हे अपघात होत आहेत.
– जयवंत शिवा नाईक, प्रियोळ – म्हार्दोळ