गोवा

पाटकर-लोबोंकडून काँग्रेसची खरेदी

backup backup

मडगाव : पुढारी वृत्तसेवा काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधीपक्ष नेते मायकल लोबो यांनी काँग्रेस विकत घेतली आहे. त्यांनी दिगंबर कामत सारख्या ज्येष्ठ नेत्याला बाजूला ठेवून मनमानी चालवली आहे. पाटकर जे कधी पंच म्हणून देखील निवडून आले नाहीत ते मला काय राजकारण शिकवणार? असा घणाघात नगर, नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी शनिवारी केला. मिका सिंग असो किंवा मायकल लोबो ज्यांनी कायदा मोडला आहे त्यांच्यावर कारवाई होणारच, असे सांगण्यास ते विसरले नाहीत. येथील एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अमित पाटकर हे साधे खाण कंत्राटदार होते. तर आपण एमबीए केलेले असून आपल्यात आणि पाटकर यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही. त्यांनी आपल्याला शिकवू नये, असे ते राणे म्हणाले. काँग्रेस पक्ष सध्या अर्थहीन झालेला आहे. जे कोण खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत, आपल्याला तो स्तर गाठायचा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप नेत्यांकडून, पंतप्रधानाकडून खूप काही शिकायला मिळते आहे. भाजपने आतापर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, गोव्याची परंपरा, वारसास्थळे टिकविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. वारसास्थळांच्या शंभर मीटरवर कुणीही कुठलेच बांधकाम करणार नाही, असा आम्ही निर्णय घेतला आहे. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. कुणीही कायदा मोडल्यास गय केली जाणार नाही. लोबो यांनी केलेली कुकर्मे विधानसभेत मांडणारच आहे.

मडगाव पालिकेतील निधीविषयी बैठक घेणार

मडगाव पालिकेत निधीवरून चाललेल्या गोंधळाबद्दल राणे यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, पालिकेचे सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्यासमवेत लवकरच बैठक घेतली जाईल. त्यावेळी निधीचा कसा वापर करावा यावर चर्चा करण्यात येणार आहे. नवीन कायद्यानुसार ज्याच्याकडे स्वतःची बॅलन्स शीट नसेल त्यांना निधी वाटणे शक्य होणार नाही.

झुआरी अ‍ॅग्रोविषयी मुख्यमंत्री बोलतील

यावेळी राणे यांना झुआरी अ‍ॅग्रोच्या जमिनीवरून प्रश्न विचारण्यात आले. कुणीही आरोप केले म्हणून ते सिद्ध होत नाही, जर घोटाळा झाला आहे तर त्याची योग्य शहानिशा करण्यात येणार आहे, असे राणे यांनी सांगितले. झुआरी अ‍ॅग्रोला अनेक खाती संबंधित असल्याने यावर मुख्यमंत्र्यांनीच भाष्य करणे योग्य होईल, असे ते म्हणाले. अ‍ॅग्रो ही विक्री करण्यासाठी नव्हे तर फक्त लिजवर दिली होती. ज्या ज्यावेळी आपल्या खात्यामार्फत घोळ झाला असेल त्या त्या वेळी आपण लक्ष घातले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT