गोवा

पणजी : बनावट कागदपत्रांद्वारे जमीन खरेदी-विक्री; जामिनावरील फरारी संशयितास पुन्हा अटक

अनुराधा कोरवी

पणजी ः पुढारी वृत्तसेवा बनावट कागदपत्रांद्वारे जमीन हडप प्रकरणाचा तपास करणार्‍या विशेष पथकाने (एसआयटीने) सोमवारी मध्यरात्री राजकुमार मैथी याला दुसर्‍यांदा अटक केली. त्याला मंगळवारी म्हापसा येथील जिल्हा सत्र न्यायालयाने (जेएमएफसी) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मैथी हा अनेक दिवसांपासून फरार होता. त्याच्यावर म्हापसा पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

राज्यातील जमिनी बनावट कागदपत्रे करून बळकावण्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सरकारने एसआयटी स्थापन केल्यानंतर आतापर्यंत एसआयटीने 15 संशयितांना अटक केली आहे. मैथी याला यापूर्वी अटक केली होती. मात्र, तो सशर्त जामिनावर सुटला होता. त्यानंतर त्याने जामिनाच्या अटी पाळल्या नाहीत.

त्यामुळे पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. एसआयटीला जमीन बळकाव प्रकरणाचा तपास करताना मैथी हा या प्रकरणात सहभागी असल्याचे पुरावे सापडल्याने एसआयटीने त्याला पुन्हा अटक केल्याचे एसआयटीच्या सूत्रांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT