पणजी : पुढारी वृत्तसेवा : जास्त व्याजाचे आमिष दाखवून पं. बंगालमधील व्यक्तीला सुमारे ७.४ कोटी रुपयांची फसवणूक करून गोव्यात येऊन लपलेल्या व अनेक महिने फरार असलेल्या संशयित ग्रेविल हेन्री वाझ (३७, ठाणे महाराष्ट्र) याला जुने गोवा पोलिसांनी अटक केली. त्याला पश्चिम बंगाल येथील गोलाबारी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अरुण कुमार सिंग (गुलाबारी पश्चिम बंगाल) यांनी १९ एप्रिल २०२२ रोजी गुलाबारी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयित ग्रेविल हेन्री वाझ याने २ डिसेंबर २०१९ रोजी प्रस्ताव सादर करून १२ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून २.५ लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले.
त्यानुसार तक्रारदाराने त्या दिवशीच प्रथम २.५ लाख गुंतवणूक केले. संशयिताने तक्रारदाराला आणखीन गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने सुमारे ७.४ कोटी रुपये गुंतवणूक केले. त्यासाठी संशयिताने तक्रारदाराला प्रत्येक ४५ दिवसांत ५९ ८० लाख रुपयांचा परतावा करण्यास नकार दिला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी संशयित ग्रेविल हेन्री वाझ याच्यासह त्याची पत्नी आणि व्यवस्थापक धीरज सोनी याच्याविरोधात तक्रार दाखल केली.
याची दखल घेऊन गुलाबारी पोलिसांनी संशयिताविरोधात तक्रार दाखल करून तपास सुरू केला; मात्र संशयित आपले मुंबई येथील आस्थापन बंद करून पसार झाला आणि तो आपले ठिकाणे बदलू लागला. त्यानुसार गुलाबारी पोलिस त्याच्या मागावर होते. याच दरम्यान संशयित गोव्यात असल्याची माहिती तेथील पोलिसांना मिळाली.
संशयित जुने गोवा परिसरात असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली जुने गोवा पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या नेतृत्वाखाली महिला उपनिरीक्षक मनीषा म्हाळकर, पोलिस उपनिरीक्षक सुदिन रेडकर, एडवीन डिसा, विराज धावसकर, आदींच्या पथकाने रविवार, दि. २९ रोजी संशयित ग्रेविल हेन्री वाझ याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक केल्यानंतर गुलाबारी पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक शिरशेंदो कुंदो यांच्या स्वाधीन केले.