मुंबई / पणजी; पुढारी वृत्तसेवा : नाताळ व नववर्ष साजरे करण्यासाठी देशभरातील पर्यटक गोव्यात दाखल होणार. असल्याने २४ डिसेंबर ते १ जानेवारी २०२३ दरम्यान गोव्यातील विमान प्रवास जवळपास तिपटीने महाग झाला आहे. २५ डिसेंबर रोजी नवी दिल्ली ते गोवा (दाबोळी) विमान प्रवासाचे तिकीट सुमारे २४ हजार रुपये झाले आहे.
त्याचप्रमाणे ३१ डिसेंबर रोजी नवी दिल्ली ते गोवा (दाबोळी) विमान प्रवासाचे तिकीट १७ ते २३ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे; तर २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान चेन्नई ते गोवा विमान तिकीट दर १८ ते २६ हजार ८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. बंगळूर ते गोव्याचे दर १० ते १८ हजारपर्यंत आहेत. कोलकाता ते गोवा हे दर १५ ते २३ हजार रुपये झाले आहेत. २४ डिसेंबर ते १ जानेवारी २०२३ दरम्यान मुंबई ते गोवा विमान तिकीट दर ८ ते १२ हजार रुपये आहे. हंगाम नसताना हेच दर सुमारे ३ ते ४ हजार रुपये असतात.
२३ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात खासगी बसचे तिकीट दरही वाढले आहेत. या काळात मुंबई ते पणजी या प्रवासाच्या तिकिटात एक हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. पुणे ते पणजी, बंगळूर-मडगाव या मार्गावरील प्रवासही महाग झाला आहे.