पणजी; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे केंद्रीय नेते आणि गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना आणि प्रदेशाध्यक्षांना दिल्लीत बोलावून लोकसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा केली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
बुधवारी (दि.21) दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री गुरुवारी गोव्यात परतले. त्यांच्या सोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे होते. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष दिल्लीला गेल्याने गोवा मंत्रिमंडळ फेरबदल व राज्यसभा उमेदवारी यावर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिल्ली भेटीत फक्त लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दिल्ली येथे अमित शहा यांच्यासह जे. पी. नड्डा व राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी भाजपच्या मुख्यमंत्री व राज्य अध्यक्षांशी बुधवारी दिवसभर चर्चा केली. प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीचे नियोजन ठरवण्यात आले. या बैठकीस लोकसभा निवडणुकीच्या एकूण तयारीचा आढावा घेण्यात आला. गोव्यातील दोन्ही जागा भाजपला मिळायलाच हव्यात यावर अमित शहा व जे. पी. नड्डा यांनी जोर दिला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
गोवा भाजप व सरकारतर्फे चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती आम्ही शहा व नड्डा यांना दिली, असे सांगून गोेव्यातील राज्यसभेच्या जागेबाबत किंवा गोवा मंत्रिमंडळ बदलाबाबत काही चर्चा झाली का, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी नाकारात्मक मान डोलावली.
भाजपचे विद्यमान राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचा कालावधी पुढील महिन्यांमध्ये संपत असल्यामुळे त्यांच्या जागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे शेट्टी यांना संधी देण्याचा विचार गोवा भाजपचा आहे. तानावडे यांनीही राज्यसभेवर जाण्यास आपण तयार असल्याचे सांगितले आहे.
काँग्रेसमधून फुटून जे आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते, त्यातील काहींना मंत्रिपद देण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आल्याची चर्चा होती. त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीपूर्वी मंत्री मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, दिल्ली भेटीमध्ये या विषयावर चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंंत्र्यांनी सांगितल्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल केला तर ज्या मंत्र्यांना वगळले जाईल त्या मंत्र्याच्या मतदारसंघात भाजपला फटका बसण्याची शक्यता गृहीत धरून लोकस़भा निवडणुकीनंतरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वाढली आहे.