गोवा

‘दक्षिण गोव्यात काँग्रेसला लोकसभा निवडणूक जड जाणार’

दिनेश चोरगे

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीला पंधरा महिने बाकी आहेत पण अजून काँग्रेसने निवडणुकीच्या द़ृष्टीने काही पावले उचललेली नाहीत. इतर पक्ष तयारी करीत आहेत. आपला पक्ष जोवर सक्रिय होत नाही तोवर मी काही राजकीय हालचाली करू शकत नाही, असे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी सांगितले.

फ्रान्सिस सार्दिन पुढे म्हणाले, मागील निवडणुकीत भाजपकडून आम्ही हा मतदारसंघ खेचून आणला होता. मडगाव आणि मडकई मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. दिगंबर कामत आणि मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांचा आपल्या विजयात मोलाचा वाटा होता. आता हे दोन्ही नेते भाजपसोबत आहेत. कामत यांच्याशिवाय मडगावात काँग्रेसला मताधिक्य मिळणे अशक्य आहे. तर ढवळीकर यांना आताच साकडे घालून मला माझा शब्द वाया घालवायचा नाही.

गेल्या वेळी फोंडा आणि शिरोडा मतदारसंघात मला फार कमी मते मिळाली होती. त्या तुलनेत मडकई आणि मडगावमधून लक्षणीय मतदान झाले होते. यंदा परिस्थिती बदलली आहे. कामत पक्ष सोडून जातील, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. त्यांच्याशिवाय मडगाव सर करणे काँग्रेससाठी बरेच कठीण होणार आहे. मला यावेळी उमेदवारी मिळणार की नाही हे माहिती नाही, तरीही मी कामाला सुरुवात केली आहे. ढवळीकर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्यासाठी काम केले होते. यंदा ते भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत. लोकसभेत ते मदत करतील असे वाटत नाही. आपण आताच शब्द टाकणे योग्य होणार नाही. आणखी सहा महिन्यांनंतर चित्र बदलेल, अशी शक्यता आहे. त्यानंतरच आपण शब्द टाकणार आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकसभेसाठी सर्व एकवीसही मतदारसंघ महत्त्वाचे आहेत. कामत यांच्यामुळे मडगावमधील मतदार नेहमीच काँग्रेसच्या बाजूने राहिले होते. मडगावात पक्ष पुन्हा मजबूत करण्याचे आव्हान आहे. केपेत आमदार एल्टन डिकॉस्ता यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तर माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची जादू ओसरली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. काही मतदारसंघात गट समित्या पुन्हा स्थापन होणे आवश्यक आहे. भाजपकडे भरपूर पैसे आहेत. तशी काँग्रेसची परिस्थिती नाही. बूथ समित्यांवर दरमहा बराच पैसा खर्च करून भाजप गुजरात मॉडेल अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जे आमदार काँग्रेस पक्ष सोडून गेले आहेत त्यांच्या मतदारसंघातील जि. पं. सदस्य आणि पंच सदस्यांना सक्रिय करून त्यांना संधी द्यायला हवी, असे ते म्हणाले.

एज इज जस्ट अ नंबर

आगामी लोकसभा निवडणूक मी लढवणार नाही, असे कधीच म्हटले नव्हते. एज इज जस्ट अ नंबर, जो पर्यंत माझी तब्येत ठणठणीत आहे तोपर्यंत मी निवडणूक लढवण्यासाठी सक्षम आहे, असे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिनयांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT