file photo  
गोवा

झुआरीनगर येथे आतेभावाचा खून

दिनेश चोरगे

वास्को; पुढारी वृत्तसेवा :  झुआरीनगर येथील संजय यादव (वय ३५) याच्या खूनप्रकरणी मामेभाऊ कन्हैयालाल यादव (३५) याला वेर्णा पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. याप्रकरणी उपअधीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्रासियस पुढील तपास करीत आहेत.

संजय यादव हा झुआरीनगर येथे आपली पत्नी व तीन मुलांसह राहतो. संजय व त्याची पत्नी मजूर म्हणून काम करतात; तर कन्हैयालाल हा ट्रक चालक आहे. तो विवाहित असून त्याची पत्नी त्याच्या मूळ गावी राहते. तो संजय याला भेटण्यास त्याच्या घरी अनेकदा येत होता. सोमवारी २६ रोजी नेहमीप्रमाणे तो सायंकाळी संजय याच्या घरी आला. त्यावेळी संजय घरी नव्हता. त्यामुळे कन्हैयालाल तेथे काही काळ बसला. त्यानंतर तो रात्री नऊच्या सुमारास आपल्या ट्रककडे निघाला. त्यावेळी तेथे आलेल्या संजयने त्याचा पाठलाग करून त्याला ट्रकच्या केबिनमध्येच गाठले. त्यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला. यावेळी कन्हैयालाल याने संजय याला बेदम मारहाण करून त्याच्या गळ्यात धारदार शस्त्र खुपसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचार न मिळाल्याने व खूप रक्तस्राव झाल्याने संजय तेथेच मृत पावला.  त्याला केबिनमध्ये ठेऊन कन्हैयालाल आतच बसला.

त्यानंतर मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास त्याने ट्रक सांकवाळ येथील एका पेट्रोल पंपच्या मागे असलेल्या निर्जनस्थळी नेला. तेथील बांधकामाच्या टाकाऊ साहित्याच्या ढिगान्यामध्ये कन्हैयालालने संजयचा मृतदेह लपविला. त्यानंतर तो माघारी परतला. तो ट्रक घेऊन सावर्डे येथे गेला. त्याने आपल्या मालकाला याप्रकरणी माहिती दिली. ती माहिती मिळाल्यावर मालकाने वर्णा पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. तर कन्हैयालाल याला सावर्डे येथे ताब्यात घेण्यात आले. संजयच्या पत्नीने पतीचा मृतदेह ओळखला. याप्रकरणी कन्हैयालाल याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT