पणजी; पुढारी वृत्तसेवा : वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात म्हादई वाचविण्याबाबत ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक रमेश वसकर यांनी हा ठराव मांडला, तर राजमोहन शेट्ये यांनी त्याला अनुमोदन दिले.
ठरावात म्हटले आहे की, म्हादई नदी प्रामुख्याने गोव्यातून वाहते. ती कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी वळविण्याचा प्रयत्न होतो आहे. सदर नदी वळविल्यास गोव्यात पाण्याची तीव्र टंचाई होईल. म्हणून ही नदी न वळवण्याचा विचार व्हावा, अशी विनंती केंद्र सरकारला करावी.
गोव्याची जीवनदायिनी असणारी म्हादई नदी कर्नाटक राज्यातून उगम पावून महाराष्ट्र आणि गोव्यातून प्रवाहित होते. नैसर्गिकरीत्या गोवा आणि महाराष्ट्र या पाण्याच्या पात्रावर विसंबून आहेत. तरीही कर्नाटक या नदीच्या प्रवाहाला वळवून महाराष्ट्र – गोवा राज्याच्या नैसर्गिक हक्कांवर गदा आणत आहे. म्हादई गोव्यातून 70 टक्के, कर्नाटकातून 24 टक्के आणि महाराष्ट्रातून 6 टक्के वाहते. कळसा- भांडुरा प्रकल्पाच्या नावाने म्हादईचे पाणी वळवल्यास गोव्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि जैवसंपदेवर मोठा परिणाम होईल. गोव्यावर पाण्याचे संकट निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत होईल. म्हादईचे पाणी न वळविण्याचा विचार या साहित्य मंचावरून व्हावा तसेच कर्नाटक सरकारच्या डीपीआरला दिलेली मान्यता रद्द करून गोवा आणि महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला विनंती करावी.
या ठरावाचे साहित्य संमेलनाच्या मंचावर टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी रमेश वसकर, राजमोहन शेटये यांनी या ठरावाची प्रत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्वला मेहंदळे, प्रकाश पागे यांच्याकडे सुपूर्द केली होती. महामंडळाच्या बैठकीत तो ठराव अगोदर मंजूर केला होता. महामंडळाच्या सर्व सदस्यांनी त्यास अनुमोदन दिले.
पणजी : वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गोव्याची जीवनदायिनी म्हादई संदर्भात मंजूर झालेल्या ठरावाचे गोवा सरकारच्या वतीने आम्ही स्वागत करतो. अखिल भारतीय स्तरावर दिग्गज मराठी साहित्यिकांच्या वतीने मंजूर झालेल्या या ठरावामुळे म्हादईसाठी सुरू असलेल्या लढ्यात आमचं बळ वाढलं आहे.