गोवा

गोव्याचा राजकीय बाजार गरमागरम

निलेश पोतदार

बन के इक हादसा बाजार में आ जाएगा, जो नहीं होगा वो अखबार में आ जाएगा चोर उचक्कों की करो कद्र की मालूम नहीं, कौन, कब, कौन सी सरकार में आ जाएगा… डॉ. राहत इंदोरी यांचा हा शेर गोव्यातील सध्याच्या राजकीय वातावरणाचे यथार्थ वर्णन करणारा.

– सुरेश गुदले, पणजी, गोवा

आपण ऋतुचक्र बदलवले. या बदलामध्ये अंतर असते. काही दिवसांचे तरी. गोव्यातील नेते या ऋतुचक्रापेक्षाही गतिमान. ते विजेच्या गतीने पक्ष बदलतात. कधीही, केव्हाही. आज येथे तर उद्या तेथे. पुन्हा, पुन्हा नवा पक्ष – नवा घरोबा. पंधरा-वीस दिवसांनी. कधी एक-दोन महिन्यांनी. एका पक्षाचा दाबजोर मलिदा करतात गट्टम. तेच नव्हे तर त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारीही. तेही पाळीवच झालेत. ते उंदीर, माकडांना लाजवताहेत. पक्षांतरांच्या टणाटण – टणाटण उड्या. आज लग्न – उद्या काडीमोड. नाहीतर निकालानंतर काडी टाकून मोड. पुन्हा नवी मांडणी. पक्ष, संघटना, पक्षाची घटना सारे बासनात. पूर्वी विचारभिन्नता असायची; आता विचारशून्यता. सगळा बाजार. सध्या तर गोव्याचा बाजार भलताच गरम. जेथे सत्ता दिसते; तेथे उड्या. यापूर्वी निवडणुकीनंतर असायच्या उड्या. आता या उडीबहाद्दरांना अगोदरच पकडतात.

गोव्याचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे फेमस वाक्य – जेथे सत्ता, तेथे बाबू. ते इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सवात नाचतातही. नैदर राईटिस्ट, नॉर लेफ्टिस्ट. वुई आर नोन अ‍ॅपॉर्च्युनिस्ट. गोव्यात हा खेळच मांडलाय. उंदीरउड्यांचा. पक्ष बदलणार नाही म्हणून मूर्तीसमोर डोके टेकवायला लावताहेत. एका नेत्याला उमेदवार पळवला जाणार, याची कुणकुण लागली. झाले, त्याने तो मतदारसंघ गाठला. उमेदवाराबरोबर प्रेस घेतली. पत्रकारांच्या समोर त्याला लहान मुलाला विचारतात तसा प्रश्न विचारला, 'जाणार नाहीस ना पक्ष सोडून?' त्याने 'नाही' या अर्थाने मान हलवली. पत्रकारही धन्य झाले. नेता त्याला घेऊन मंदिरात गेला. त्याला मूर्तीसमोर डोके टेकवायला लावले. गड्याची दुसर्‍या दिवशी पक्षांतराची उंदीरउडी. एक उदाहरण. 'हिमनगाचे टोक' हा शब्दप्रयोगही पडावा थिटा. आता बोला! अमक्या-तमक्याची सत्ता येण्याची चिन्हे दिसताच उंदीर पुन्हा बुलेट ट्रेनच्या वेगाने धावतील. ज्याच्या हाती ससा तो पारधी.

विधानसभेच्या जागा 40. बहुमतासाठीचा जादुई आकडा 21. हरेक मतदारसंघातील मतदारसंख्या 25 हजारांच्या आसपास. सर्वांत जुना पक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, बहुजनवादी नेते दिवंगत भाऊसाहेब बांदोडकर यांनी स्थापन केलेला पक्ष. आता या पक्षाची झालीय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. दोघे राजकीय बंधू मालक. भाजप, काँग्रेसही तसे जुनेच पक्ष. आम आदमी पक्षाची एंट्री झाली 2012 मध्ये. ते प्रामाणिकणे राबताहेत. तृणमूल काँग्रेसने आत्ता कुठे प्रवेश केलाय. गोवा फॉरवर्ड, रिव्होल्युशनरी गोवन्स स्थानिक पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी खाते खोलले तरी खूप. बाकी इटुकले-पिटुकले उंदीरमामा. बाजार म्हटले की अपक्षवाले आलेच. कुंपणावरचे. दर वाढवून घेणारे. भाजप – काँग्रेस तसे मोठेच पक्ष. त्यांची धडपड आहे ती '21 प्लस'साठी, जे अशक्य दिसते. '21 प्लस'च्या गणितात द्रोण लावण्याचा बाजार. त्यामुळे उड्या. आत्ताही असतील, नंतरही. लोकशाही नव्हे; आकडेशाहीच्या नावानं चांगभलं. उमेदवारीचा एकमेव जागतिक मापदंड – जिंकण्याची क्षमता. सर्वच पक्षांचा. मग लावा जिंकणार्‍या घोड्यावर पैसा. परिणाम काय तर? सत्ता आणि अर्थकारणामुळे प्रचंड राजकीय अनिश्चितता. राजकीय अस्थिरता. काय होईल सांगता येत नाही. खेळ बघत बसणे इतकेच हाती. 21 या जादुई आकड्यासाठी सारी लढाई. मतदानापूर्वीच जोडण्या. नंतर यातायात करावी लागू नये 2017 प्रमाणे. ज्याची जिंकण्याची क्षमता त्याला पक्षात घ्या. येत नसेल तर पाठिंबा घ्या. सत्तातुरां येन केन प्रकारेनं, भयं ना लज्जा.

गोव्यात आमदारांची खरेदी केली जाते, असे गोव्यात लोक बोलतात, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरेदी व्यवहारात तथ्य अर्थातच. आग आहे म्हणून धूर. त्यांचा रोख तृणमूलकडे. तृणमूल काँग्रेसचा प्रचाराचा दंगा दणक्यात. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी-राज्याच्या कानाकोपर्‍यात. टीएमसीचे प्रचार गाणे 'दीदी ओ दीदी' सर्वत्र असते. यू ट्यूबवर जा-दीदी भेटते. इंटरनेटवर कोठेही जा – दीदीच दीदी. काही पक्षांचा कारभार जागतिक कंपन्यांसारखा. उमेदवाराला खर्चासाठी अमूक-तमूक. बाकी खर्च आम्ही बघतो. तो कितीही येवो. ते आम्ही पाहतो. तुम्ही सांगा, सुचवा काय करायचेय ते. नियोजन आम्ही करू. खर्चही आम्ही करू. तुम्ही लढा. काय बोलायचे आहे ते लिहून देऊ. तेवढेच बोला. एक उदाहरण – टीएमसीने लुईझिन फालेरो यांसारख्या माजी मुख्यमंत्र्याला जाळ्यात ओढले. त्यांना खासदार केले. पक्षाचा उपाध्यक्ष केले. बेरकी, चतुर नेता. त्यांना 'आवाज' नाही दिला. बोलतात त्या महुआ मोईत्रा. त्यांचे बोलणे ऐकले की काय विचारू नका. गोव्याचा दांडगा अभ्यास राव. विलक्षण आवाका, आवही. दिसतोही, असो.

सर्वच पक्षांनी पाडलाय आश्वासनांचा पाऊस. निसर्गालाही लाजवणारा. मतदारांच्या प्लेटमध्ये सूर्य-चंद्र-तारेे देऊ इतकेच आश्वासन बाकी. खाणी सुरू करू, अमूक-तमूक बंद पाडू. वीज, पाणी, रस्ते, प्लॉट, शिक्षण, महिलांना सुरक्षा – सारे सारे मोफत. जाऊ दे झाडून. काम-धंदा, नोकरीची गरजच नाही. खा-प्या-मजा करा. सध्याच्या योजनांचा कागदावर विस्तारही केला. महिलांसाठी गृहआधार योजना. त्यामुळे महिन्याला दीड हजार मिळतात. दुसरा पक्ष म्हणाला – आम्ही पाच हजार देऊ. तुमचा 'गृहआधार' तर आमची 'गृहलक्ष्मी'. सत्तेचा पत्ता नाही; पण नावनोंदणीही सुरू. आम्हीही हावरटच. बाजारात तुरी – नोंदणीसाठी हाणामारी. प्रत्येक घरात एक नोकरी देणार. राज्याची लोकसंख्या सुमारे पंधरा लाख. मतदार सुमारे अकरा लाख. सध्याचे सरकारी नोकर सुमारे साठ हजार. तेच आहेत अतिरिक्त. तरी घरटी एका सरकारी नोकरीची ग्वाही. बोलाचाच भात. खावा हवा तेवढा.

जात-देव-धर्म या पारंपरिक कार्डांचीही चलती. जो धारणा करतो तो धर्म. साधी, सोपी व्याख्या. नेत्यांना मतदारांची धारणाच बिघडवायची आहे. सर्वच पक्षांचा हा उद्योग सुरू आहे. अपवाद नसावा ही व्यवस्थेची शोकांतिका. कूळ-मूळ शोधून कुंडल्या मांडताहेत. अमूक-तमूक उमेदवार अमक्या जातीचा, अमक्या धर्माचा. त्याचे वडील अमूक तर आई तमक्याची. टीएमसी म्हणजे – मंदिर-मशीद-चर्च. हा सर्व टिप्पीरा आहे जाहीर. समाजमाध्यमातील दंगा राजकारणाची चव सांगतो. सर्वात संतापजनक एक कार्ड वापरले जाते -'स्त्री'. हाही 'उद्योग' सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर. जुनी-नवी प्रकरणे शोधून काढून मांडताहेत. तसेच जुन्या खटल्यांवरही झोत टाकला जातोय. 'आत' कोणी जायची शक्यता कमीच. खेळ मात्र मांडलाय. बाजार गरमागरम. बाजार म्हटले की येतेच नफेखोरी. ही बाभळ आपणच पेरलीय. काटेच मिळणार. आंब्याची अपेक्षा कशी करू शकतो? आपण अगोदर उंदीर होतो. त्यामुळे उंदीरउड्या पाहण्याची वेळ आपल्यावर येते. त्या कायद्याने कशा बंद होतील पाहायला पाहिजे. आम आदमी पक्षही सांगतोय की, पक्षांतराला कायद्याने कसा अटकाव आणता येईल त्याचा आम्ही विचार करत आहोत. आम्ही तसे शपथपत्र उमेदवाराकडून लिहून घेणार, असे हा पक्ष म्हणतोय. चला, एक पक्ष तरी या विषयावर गंभीर बोलतोय. कृतीची वाट पाहू. कीर्तनाने समाज सुधारत नसतो तसा कायदा केला म्हणून होईल असे नव्हे. 'कौन, कब, कौन सी सरकार में आ जाएगा' हे आपण ठरवू तो दिन सुदिन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT