गोवा

गोवा : हे विधात्या.. तू इतका कठोर का झालास? फोंड्यातील वृद्धाची करुण कहाणी

मोहन कारंडे

मडगाव : विशाल नाईक : हे विधात्या.. तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसर्‍या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. पण मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणाकरा आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोक आदळायच?…हा संवाद प्रसिद्ध नटसम्राट नाटकातील असला तरीही हीच परिस्थिती फोंड्यातील महादेव पाटील सध्या मडगावातील लोहिया मैदानावर जगत आहेत.

वयाच्या सत्तरीकडे आलेल्या महादेव यांना आता धड उभेही रहाता येत नाही. शरीर थकल्याने उभे राहताना हात-पाय थरथरतात. अशा काळात वाईट काळात कुटुंबाचा आधार महत्वाचा असतो. पण कुटुंबाने पाठ फिरवल्याने आता लोहिया मैदानाचा पदपथ हाच त्याचा आसरा आहे. गेल्या चार वर्षांपासून पाटील मडगावात पदपथावर आपले आयुष्य काढत आहेत. पूर्वी ते ग्रेस चर्चच्या पदपथावर राहायचे. पण तेथून त्यांना हाकलल्यानंतर वर्षभरापासून ते लोहिया मैदानाच्या पदपथावर आश्रयाला आहेत. खांडेपार पंचायतीच्या मतदान यादीत नाव असल्याचे ते सांगतात. भाऊ आहे पण तीथे माया नाही. आईने आपल्याला घरी येऊ नको असे सांगितले होते. म्हणून पुन्हा कधीच घरी गेलो नाही. आई-वडील जिवंत आहेत की नाही हेही माहिती नाही. आता पाय जायबंदी झालेल्या अवस्थेत घरी जाऊन भावंडावर मला भार घालायचा नाही. शेवटचा श्वास असाच कधी तरी रस्त्यावरच जाईल, अशी भावनिकता त्यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केली.

पाटील हे मूळ फोंड्याच्या कुर्टी येथील राहणारे आहेत. गवंडी काम हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे. आपण शाळा सोडल्यानंतर गांवडी काम सुरू केले. अनेक वर्षें कुंकळ्ळीतील खणगिणी येथे काम केले. तिथे माझी एक खोलीही होती. काम करताना उंचावरून पडून माझे पाय जायबंदी झाले. धड उभेही राहता येत नव्हते त्यामुळे गवंडी काम सोडावे लागले. खोलीचे भाडे भरता न आल्याने खोलीच्या मालकाने टाळे ठोकले. माझे कपडे, भांडी शेगडी आदी साहित्य खोलीतच आहे, अशी शोकांतिका त्यांनी मांडली. आता शारीराने मी थकलो आहे. घरदार असताना मला भिकर्‍यांसोबत पदपथावर झोपावे लागत आहे. पायावर उपचार करण्यासाठी मी जिल्हा इस्पितळात जाऊन कागदपत्रे केली होती. पण पदपथावर फिरणार्‍या चोर्‍यांनी दवाखान्याच्या पेपरांची पिशवी पैसे समजून लंपास केली. आता पुन्हा दवाखान्यात जायला माझ्याकडे पैसे नाहीत आणि मी दोन पावले चालूही शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

मडगावात अनेक दानशूर व्यक्ती आहेत. सायंकाळी जेवण घेऊन गाडी येते. पण रांगेत उभे राहयाला पायात बळ नाही. माझी परिस्थिती पाहून मला ते जेवण देतात. अनेकदा माझ्या वाट्याचे जेवण दुसरेच हिसकावून घेतात. त्यामुळे उपाशी झोपल्याशिवाय पर्याय राहत नाही, असे ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT