हणजूण : पुढारी वृत्तसेवा : हणजूण येथे पर्यटकांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी आणखी एका संशयितास अटक केली. जोसेफ अलेक्स लोबो (५७, रा. सोरांटोवाडो, हणजूण) असे अटक केलेल्या चौथ्या संशयिताचे नाव आहे. चौघा संशयितांना न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या हल्ल्याप्रकरणी आणखी काही संशयितांना अटक केली जाणार असल्याचे उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले. दिल्ली येथील अश्विनी कुमार शर्मा यांचे कुटुंबीय पर्यटनासाठी हणजूण येथे आले होते. ते एका रिसॉर्टमध्ये थांबले होते. तेथे कामगाराबरोबर झालेल्या वादानंतर त्या कामगाराने आपल्या साथीदारांसह त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करून जबर जखमी केले होते.
पीडितांनी या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून रॉयस्टन डायस, नायरॉन डायस या दोघा भावांसह काशिनाथ आगरवडेकर याला अटक केली होती. तपास कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी हणजूण पोलिस ठाण्यातील एका उपनिरीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली.