गोवा

गोवा : सावर्डे सरपंचपदी चिन्मई नाईक शक्य

दिनेश चोरगे

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालेल्या सावर्डे पंचायतीच्या महिलांसाठी राखीव असलेल्या सरपंच पदावर चिन्मई नाईक तर उपसरपंच पदावर नितेश भंडारी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.शुक्रवारी भाजपाच्या समर्थनावर निवडून आलेल्या सर्व पंचसदस्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार गणेश गावकर यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली आहे. भाजपचे सहा पंच सावर्डे पंचायतीवर निवडून आल्यामुळे पाऊसकर गटावर तूर्त विरोधात राहण्याची वेळ येणार आहे.

भाजपचे सहा पंच निवडून आल्याने सावर्डे पंचायतीवर या पक्षाची सत्ता आली आहे. भाजपने माजी मंत्री दीपक पाऊसकर यांच्या उमेदवारांना रोखण्यासाठी केलेले प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी ठरले तरी माजी सरपंच संदीप पाऊसकर यांच्या पत्नी सिद्धी पाऊसकर यांच्यासह पाऊसकर पॅनलमधील एकूण तीन पंच सदस्य निवडून आले आहेत.

सावर्डे पंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागून होते.भाजपमधून निवडून आलेल्यापैकी संजय नाईक, शशिकांत भंडारी आणि दीपक सावंत या तिघांनी यापूर्वी सरपंचपद भोगलेले आहे. शिवाय यंदा सरपंचपद राखीव असल्याने त्यांच्या पॅनलमधील उन्नती वडार आणि चिन्मई नाईक यांचीच वर्णी लागण्याची शक्यता होती. पण हाती आलेल्या माहितीनुसार चिन्मई यांचे नाव सध्या सरपंचपदासाठी
चर्चेत आहे. उपसरपंच पदासाठी नितेश भंडारी इच्छुक असल्याचे समजते. अडीच वर्षानंतर सरपंचपद उन्नती वडार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

पाऊसकर यांच्या पॅनलमधील प्रभाग सहामधून सिद्धी प्रभू पाऊसकर, प्रभाग पाचमधून गोकूळदास नाईक आणि प्रभाग चारमधून नीलेश तारी निवडून आले आहेत. संदीप पाऊसकर यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यामुळे त्यांची पत्नी सिद्धी पाऊसकर त्यांच्या ऐवजी रिंगणात उतरल्या होत्या. विद्या सावर्डेकर आणि कोमल कुडाळकर यांचा पराभव करून सिद्धी यांनी पाऊसकर यांचा गड राखला आहे. पाऊसकर यांचा पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले असले तरीही मंडळ स्थापनेत त्यांचा सहभाग नसेल, हे स्पष्ट होत आहे. धडे, माडेल प्रभागाचे पंच शशिकांत नाईक यांनी पुढारी जवळ बोलताना अद्याप पाऊसकर गटातील कोणीही त्यांच्याशी संपर्क साधला नाही, असे सांगितले.

सावर्डेत काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात
जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुकीनंतर पंचायत निवडणुकीतही भाजपने सावर्डेत काँग्रेसला धूळ चारल्याने सावर्डेत काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. धडे माडेल येथील प्रभागात काँग्रेसचे युवा नेते संकेत भंडारी रिंगणात उतरले होते. पण भाजपच्या उमेदवारापुढे त्यांचाही टिकाव लागला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे स्वतः कुडचडेचे विधानसभेचे उमेदवार राहिलेले आहेत. पण त्यांनाही सावर्डेत एकही उमेदवार निवडून आणता आला नाही, याची चर्चा जोरात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT