पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. अधिवेशनात 'म्हादई' चा मुद्दाच जास्त गाजण्याची शक्यता आहे. तसेच सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण, अमली पदार्थ व्यवहार, कायदा सुव्यवस्था, झुआरी जमीन आणि कला अकादमी हे विषयही चर्चेस येऊ शकतात.
पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे. यामध्ये सरकारने केलेल्या विविध कार्यांची माहिती देतील. त्यानंतर विविध क्षेत्रांतील मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात येईल. नामवंत व्यक्तींचे अभिनंदन केले जाईल. सचिव राज्यपालांच्या संमतीसाठी ३१ कायदे / दुरुस्त्या
देतील. सर्वात शेवटी मुख्यमंत्री विधिमंडळ कामकाज समितीचा अहवाल सादर करतील.. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी १९ रोजी 'म्हादई' विषयावर चर्चा करण्यात येईल. याबाबत वेळ सांगितली नसली, तरी ही चर्चा रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे.
याशिवाय दोन दिवसांत कायदा आणि सुव्यवस्था, भ्रष्टाचार, रस्ते, अपघात आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात एकूण ६०९ प्रश्न आले आहेत. यातील १३४ तारांकित, तर ४७५ अतारांकित प्रश्न आहेत. या शिवाय लक्षवेधी सूचना, शून्य प्रहर, पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे.