गोवा

गोवा : वास्कोतील फेरीत प्लास्टिकला मज्जाव

दिनेश चोरगे

वास्को;  पुढारी वृत्तसेवा :  येथे 3 ऑगस्ट रोजी होणार्‍या प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताहाची कायदा सुव्यवस्थेविषयी बैठक उपजिल्हाधिकारी कार्यालयात झाली. अतिरिक्त ताबा घेतलेल्या उपजिल्हाधिकारी स्नेहल प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठक संपन्न झाली. सप्ताह काळात थाटण्यात येणारी फेरी दुकाने फक्त सात दिवस ठेवण्याच्या आदेशाबरोबर सप्ताह काळात प्लास्टिक पूर्ण बंदी घालण्याचा आदेशही यावेळी देण्यात आला.

यंदाचा वास्कोचा प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताह यंदा होणार की नाही याची उत्सुकता शिगेला पोचली होती. उशिरा का होईना उत्सव समितीने बैठक घेऊन यंदा वास्को सप्ताह कमी प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतला. मात्र सप्ताह काळात फेरी, दुकाने थाटण्याचा निर्णय पालिकेचा असल्याने सदर निर्णय पालिकेवर सोडण्यात आला होता. पालिका बैठकीत सदर विषय मांडून सप्ताह काळात फेरी भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सात दिवस फेरी भरण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिरातील धार्मिक विधी व इतर कार्यक्रम उत्सव समितीवर सोपविण्यात आले. त्यानुसार उत्सव समितीने कोविड नियमांचे पालन करून सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सप्ताह काळात फेरी भरणार असून कायदा सुव्यवस्थेविषयी चर्चा करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज विभाग, अग्निशामक दल, पालिका अधिकार्‍यांची तसेच उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी प्रभू यांनी या बैठकीत संबंधित अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले तसेच सूचना दिल्या.

नियमभंग करणार्‍यांवर कारवाई करणार
वास्को सप्ताह प्लास्टिक मुक्त साजरा करण्याचाही आदेश यावेळी देण्यात आला. सप्ताहात कायदा सुव्यवस्थेत आडकाठी आणणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा आदेशही यावेळी देण्यात आला. कोव्हिड प्रणालीचे पालन करून श्री दामोदर भजनी सप्ताह साजरा करण्याचे आवाहन यावेळी उपजिल्हाधिकारी प्रभू यांनी दिले.

SCROLL FOR NEXT