गोवा

गोवा : रेल्वेचे खांब घालण्याचे काम बंद पाडले

दिनेश चोरगे

वास्को,  पुढारी वृत्तसेवा : जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना रेल्वे कंत्राटदाराने वेळसाव रेल्वे लेव्हल क्रॉसिंगजवळ काँक्रिट खांब घालण्याचे काम सुरू केले होते. गोंयचो एकवोटने हे काम थांबविले.कंत्राटदाराने वरिष्ठांच्या सूचनेनंतर तेथील काँक्रीटचे खांब ट्रकमधून नेल्याने येथील तणाव निवळला.

रेल्वे विकास निगम लिमिटेडने नियुक्त केलेला हैदराबाद येथील कंत्राटदराने वेळसाव लेव्हल क्रॉसिंगजवळ सध्याच्या रेल्वे मार्गाला समांतर काँक्रीट खांब घालण्याचे काम बुधवारी सुरू केले होते. याप्रकरणी गोंयचो एकवोटचे ऑर्विल दोरादो रॉड्रिग्ज व इतरांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत काम बंद करण्यास सांगितले. हे खांब घालण्यात आले असते, तर तेथील स्थानिकांची पारंपरिक वहिवाट बंद होण्याची भीती होती. त्याशिवाय या जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे.

जमिनीवर रेल्वेचा अधिकार नाही

रॉड्रिग्ज म्हणाले की, 1890 मध्ये आमच्या पूर्वजांनी रेल्वेमार्ग घालण्यासाठी ही जमीन कधीही विकली नाही किंवा देणगीदाखल दिली नाही. मुरगाव बंदरातील माल वाहतुकीसाठी या जागेतून रेल्वेमार्ग घालण्यासाठी तत्कालीन रेल्वे प्राधिकरणाला परवानगी दिली होती. त्यानंतर या मार्गावरून माल व प्रवासी वाहतूक सुरू झाली होती. त्यामुळे या जागेवर रेल्वेचा अधिकार नाही.

आता या मार्गावरून मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक होते. यामुळे गावकर्‍यांना त्रास होतोच शिवाय पर्यावरणावही परिणाम होत आहे. आमचा दुपदरीकरण रेल्वेमार्गाला विरोध आहे. मात्र, रेल्वेकडून या ना त्या कारणास्तव ग्रामस्थांना त्रास देणे चालूच आहे. बुधवारच्या प्रकरणात कंत्राटदाराने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे बोलणी करून काम थांबविण्याचा समजूतदारपणा दाखविल्याने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.

SCROLL FOR NEXT