गोवा

गोवा : म्हादईसाठी पेटली जनआंदोलनाची क्रांतिज्योत

दिनेश चोरगे

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  सेव्ह म्हादई फ्रंटतर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी म्हादईच्या लढ्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी घरोघरी कलश पूजनासह पणती, दिवे, मेणबत्त्या लावल्या. मुख्य शहरांसह ग्रामीण भागांतही लोकांमध्ये उत्साह दिसून आला. पेडणे, फोंडा, म्हापसा, पणजी, मांद्रे येथे लोकांनी घरोघरी म्हादईचे पूजन करून दिवे लावले. काहींनी म्हादईचे पाणी कलशात भरून त्याची पूजा केली. पणजीमध्ये 'बोक दे व्हॉक' येथे प्रजल साखरदांडे, महेश म्हांबरे, तनोज अडवलपालकर यांच्यासह सेव्ह म्हादई फ्रंटच्या अन्य सदस्यांनी झर्‍यातील पाण्याजवळ दिवे लावले.

यावेळी प्रजल यांनी सांगितले की, या झर्‍यातील पाणी हे म्हादई आहे. येथे पणती लावून कर्नाटक सरकारला दाखवून दिले की, आम्ही लढाईमध्ये मागे नाही. या कार्यक्रमात हिंदूंसह ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधवांनीही सहभाग घेतला होता. म्हांबरे यांनी सांगितले की, या प्रतीकात्मक आंदोलनामुळे कर्नाटक, गोवा आणि केंद्र सरकाच्या डोक्यात उजेड पडेल अशीच आमची अपेक्षा आहे. दरम्यान, फोंडा येथे मुस्लिम बांधवांनी म्हादई वाचवा आंदोलनाला पाठिंबा दिला. समाज बांधवांनी एकत्र येत म्हादईसाठी दुवा मागितला. म्हापसा येथे म्हादईसाठी पदयात्रा काढण्यात आली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही घरामध्ये पणती, दिवे लावून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

मांद्रेत घरोघरी कलशपूजन

पेडणे : म्हादई नदी वाचवण्यासाठी मांद्रे मतदारसंघातील अनेक घराघरात कलश पूजन व पणती पेटवून म्हादई वाचवा आंदोलनाला पाठिंबा देण्यात आले. यापूर्वी मांद्रे येथे सर्वपक्षीय स्थानिक कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, पंच, नागरिक, पर्यावरण प्रेमी यांची मांद्रे येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून केवळ आपली जीवनदायिनी असलेल्या म्हादईला वाचवण्यासाठी प्रत्येकाने घरोघरी कलश पूजन, दिवाबत्ती लावावी असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिकांनी आपल्या घरी कलशाचे पूजन केले. कलशाचे पूजन करत असताना ज्येष्ठांसोबत बालक आणि ज्येष्ठ महिला नागरिकांचाही समावेश होता. हे चित्र मांद्रे मतदारसंघातील काही घराघरात दिसून आले. त्याचप्रमाणे पेडणे मधील घरांमध्येही कलश पूजन करण्यात आले.

म्हापसा शहरात मशाल मिरवणूक

म्हापसा : आम्ही गोयकर या संघटनेतर्फे रविवारी संध्याकाळी मशाल आणि दीपप्रज्योती करून शहरातून मिरवणूक काढून म्हादई वाचवण्यासाठी सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. सुरुवातीस महात्मा गांधी चौकात जाऊन महात्माजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच जलकुंभासही हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आमका जाय आमका जाय महादई आमची आमका जाय…. अशी घोषणा देत मिरवणूक हुतात्मा स्मारकाकडे आली. सर्वांच्या हातात मेणबत्ती किंवा मशाल होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणावर पुष्पहार ठेवून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. गांधी चौकात परतल्यावर पेटत्या मेणबत्ती सर्वत्र लावण्यात आल्या व उपस्थितांसमोर विचार मांडण्यात आले. यावेळी अ‍ॅड. यतीन नाईक, ऐश्वर्या साळगावकर, डॉ. रिचार्ड डिसोजा,संजय बर्डे, राहुल म्हांबरे, अनिल केरकर, राजन घाटे, दीपेश नाईक, झायगल लोबो यांनी विचार मांडले.

आमचे तीनही खासदार म्हादई प्रश्न मूग गिळून आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. या प्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. भाजपला पक्षाचे यश महत्वाचे आहे. ते गोमंतकियांचे हीत पाहत नाहीत. त्यामुळे आमदार, नगरसेवक, नगराध्यक्ष, पंच सदस्य यांनी पक्ष बाजूला ठेवून म्हादई आंदोलनात सहभागी व्हावे. कर्नाटक सरकार यशस्वी झाल्यास सह्याद्रीचा डोंगर करपून जाईल. गोव्यात पाणी टंचाई होईल. जैवविविधता पर्यावरण नष्ट होईल गोमंतकीय पाण्या वाचून वंचित होतील म्हणून सर्व गोमंतकीयांनी पुढील धोका ओळखून या आंदोलनात सहभागी होऊन ते यशस्वी करावे असे आवाहन करण्यात आले. सूत्रसंचालन मार्शल परेरा यांनी, तर जॉन लोगो यांनी आभार मानले.

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

गोवा सरकारने दाखल केलेल्या इंटरलोक्युटररी याचिकेवर सोमवार (दि. 13 ) रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गोव्याने या याचिकेत कर्नाटकच्या डीपीआरला दिलेली मंजुरी रद्द करण्याची मागणी केली आहे. यामुळे गोव्यातील वन्यजीवनावर घातक परिणाम
होणार असल्याचा दावा गोवा सरकारने केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT