पणजी; पुढारी वृत्तसेवा : साखळी येथे १६ जानेवारी रोजी होणाऱ्या 'म्हादई' वाचवा सभेची परवानगी साखळी नगरपालिकेने अचानकपणे रद्द केली आहे. याबाबत गुरुवारी पालिकेने आयोजकांना पत्र पाठवले आहे. यामध्ये रहदारीची समस्या होण्याची शक्यता असल्याने परवानगी रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे. यामुळे विरोधी पक्षांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साखळी येथील आदित्य भांगे यांनी १६ जानेवारी रोजी जनमत कौल दिवस साजरा करण्यासाठी साखळी नगरपालिकेकडे परवानगी मागितली होती. नगरपालिकेने भांगे यांना ९ जानेवारी रोजी नगरपालिका मैदानावर जनमत दिवस साजरा करण्यासाठी सभा घेण्यास परवानगी दिली होती. यासाठी एकूण दहा अटी घालण्यात आल्या होत्या. या सभेला विविध राजकीय पक्षांसोबत, सामाजिक संस्था, पर्यावरण कार्यकर्ते उपस्थित राहणार होते. सभेमधून सरकारवर जोरदार टीका होण्याची शक्यता होती. 'म्हादई' वाचविण्यासाठी पुढील दिशाही ठरणार होती. राज्यभरातून हजारो 'म्हादई' प्रेमी सभेला उपस्थित राहणार होते. मात्र, पालिकेने ऐनवेळी सभेची परवानगी नाकारली आहे.
पालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी भांगे यांना पाठवलेल्या पत्रात म्हणले आहे की, १६ रोजी सोमवार आहे. यादिवशी साखळीचा आठवडी बाजार आहे. दोन्ही कार्यक्रमांमुळे या भागात रहदारी होण्याची शक्यता आहे. याबाबत साखळी व्यापारी संघटनेने पत्र लिहून काळजी व्यक्त केली होती. त्यामुळे तुम्हाला देण्यात आलेली परवानगी मागे घेण्यात येत आहे.
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हणले आहे की, सरकारने जनमत कौलाच्या दिवशीच जनमताचा गळा घोटला आहे. 'म्हादई' वरील जनसभेला परवानगी नाकारणे हे आकलन शक्तीच्या बाहेर आहे. गोवा, गोवेकर स्वतंत्र नाहीत हेच यातून सिद्ध झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आधी 'म्हादई'ची हत्या केली आणि आता लोकशाहीची.
विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव म्हणाले की, जीवनदायीनी 'म्हादई' सोबत भाजप सरकारने विश्वासघात केला. याविरोधात तयार झालेल्या तीव्र जनक्षोभाने घाबरून मुख्यमंत्र्यांनी सभेची परवानगी रद्द केली आहे. मी या कृत्याचा तीव्र निषेध करतो. म्हादई जागृती आंदोलनाने भाजप सरकारला जनतेसमोर गुडघे टेकवावेच लागतील, हे डॉ. सावंत यांनी लक्षात ठेवावे.
आप प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. भाजप सरकार लोकांच्या आवाजाला घाबरले आहे. तुम्ही परवानगी रद्द करू शकता. मात्र,आमचा आवाज दाबू शकत नाही.