पणजी; पिनाक कल्लोळी : जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधून टपाल पत्र संग्रहक आणि शास्त्रज्ञ डॉ. रमेश कुमार यांनी आपल्या देशभरातील मित्रांना टपाल पत्रे पाठवली आहेत. यामध्ये राज्याची कला, संस्कृती, वारसा, वन्यजीव दर्शविणार्या 75 टपाल पत्रांचा समावेश आहे.
जगभरात 30 जुलै रोजी 'आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस' साजरा केला जातो. डॉ. कुमार यांनी यावर्षी वेगळ्या पद्धतीने मैत्री दिन साजरा करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी देशभरातील 50 शहरांत छायाचित्रे असणारी पत्रे पाठवली आहेत. यामध्ये त्यांचे मित्र, कुटुंबीय आणि सहकार्यांचा समावेश आहे.
मैत्री दिनानिमित्त मी माझ्या मित्रांना राज्याविषयी माहिती देणारे छायाचित्र टपाल पत्रे पाठवली आहेत. याद्वारे मला पारंपरिक टपालांचा वापर करायला मिळाला. त्याशिवाय टपाल पत्रातून माझ्या मित्रांना गोव्याच्या संस्कृतीची माहिती देण्याची संधीही मिळाली.
– डॉ. रमेश कुमार,
माजी अध्यक्ष, गोवा फिलाटली आणि न्यूमिस्मॅटिक्स सोसायटी
टपालाद्वारे मिळवा मित्र
डॉ. कुमार यांनी सांगितले की, पूर्वी टपाल पत्राद्वारे मैत्री टिकवली जात होती. आताच्या नवीन युगात ही प्रक्रिया पोस्ट क्रॉसिंग नावाने पुन्हा रुजू झाली आहे. याद्वारे तुम्ही जगात कुणालाही पत्र पाठवू शकता. या पत्राला कोणतीही अन्य व्यक्ती पत्र पाठवूनच उत्तर देते.