गोवा

गोवा : महावीर अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन

मोनिका क्षीरसागर

धारबांदोडा : पुढारी वृत्तसेवा
मोले येथील भगवान महावीर अभयारण्यात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे. या अनुषंगाने मोले वन खात्याने स्थानिक पंचायतींना पत्र पाठवून स्थानिकांनी लाकडे आणण्यासाठी व गुरांना चरविण्यासाठी या भागात जाऊ नये असे स्पष्ट सूचित केले आहे. त्याशिवाय याबाबत या परिसरातील जनतेमध्ये जागृती करण्याचे निर्देश दिले आहेत.

वनखात्याने दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनला मोले वन्यजीव विभागाचे वनाधिकारी सिद्धेश नाईक यांनी पत्र पाठविले असून, लोकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना केल्या आहेत. वनखात्याने राज्यात गेल्या काही दिवसांपासून व्याघ्रगणना सुरू आहे. त्या अनुषंगाने पडताळणी करीत असताना मोले अभयारण्यात पट्टेरी वाघांचा अधिवास असल्याचे सिद्ध झाले आहे. वाघांकडून नागरिकांवर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेऊन वन खात्याने स्थानिक पंचायतीला आपल्या परिसरात वाघाच्या अस्तित्वाबद्दल जागृती करावी आणि नागरिकांनी मोले अभयारण्यात परिसरात जाऊ नये, या हेतूने हे पत्र पाठवण्यात आले आहे.

जलसाठ्यांतील पाणी ओसरण्याचा परिणाम

वनक्षेत्रातील जलसाठ्यांतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पाण्याच्या शोधात वनचर फिरत असतात. त्यामुळे ते काही वेळा वस्तींकडेही येत असल्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. त्यामुळे वाघाचे दर्शन घडणे हाही त्याचाच एक भाग असल्याचे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे.

SCROLL FOR NEXT