गोवा

गोवा : भाजपचे मिशन लोकसभा; नाराजांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न

मोहन कारंडे

पणजी; पुढारी वृत्तसेवा : पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपशी संलग्न असलेल्या मात्र काही कारणांमुळे दुरावलेल्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना पुन्हा भाजपशी जोडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर व मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल यांनाही पुन्हा भाजपमध्ये सहभागी करून घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या दोघांबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हटले आहे.

2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा त्याग करून अपक्ष निवडणूक लढवलेले माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना स्वगृही आणण्याची तयारी काहीजण करीत असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तानावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही. आहे त्या पदावर आपण समाधानी असल्याचेही तानावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

ते म्हणाले, राजकारणात विविध प्रकारच्या चर्चा होत असतात. आपण उत्तर गोवा लोकसभेसाठी उत्सुक असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नाही. आपण सध्या प्रदेशाध्यक्ष आहे. आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. आहे त्या पदावर आपण खूश आहे. यापूर्वी आपण आमदार असताना पक्षाने उमेदवारी नाकारली व दुसर्‍या व्यक्तीला दिली. मात्र, आपण पक्ष सोडला नाही. पक्षाने अन्याय केला, असे वाटले तरी निष्ठावंतांनी पक्ष सोेडू नये. कारण पक्ष जो काही निर्णय घेत असतो तो विचार करून घेत असतो. पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षाचे काम करत राहणे नितांत गरजेचे असते. पक्ष केलेल्या कामाची पावती निश्चित देतो. बूथ कार्यकर्ताही राज्यात किंवा केंद्रात नेतेपदी पोचू शकतो. पंतप्रधान होऊ शकतो, प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो, राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. हे फक्त भाजपातच होऊ शकते, असेही तानावडे यांनी यावेळी सांगितले.

पक्षाने प्रा. पार्सेकर यांना उमेदवारी न देता दयानंद सोपटे यांना दिली. पार्सेकर यांनी अपक्ष राहण्याचा विचार सुरू केल्यानंतर स्थानिक पातळीवर आणि केंद्रीय पातळीवरूनही पार्सेकर यांची मनधरणी करण्यात आली. त्यांनी पक्ष सोडू नये, अशी प्रत्येकाला वाटत होते. कारण गोव्यामध्ये पक्ष वाढवलेल्या व्यक्तींमध्ये पार्सेकरही होते. पक्षाने त्यांना राज्याचे सर्वोच्च असणारे मुख्यमंत्रिपद दिले. प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेले होते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडू नये व बंडखोरी करू नये, अशी त्यांना विनंती करण्यात आली. केंद्रीय नेत्यांनीही त्यांना समजावले. मात्र, त्यांनी पक्ष सोडला व अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यामुळे भाजपचा उमेदवार मांद्रेत पराभूत झाला. प्रा. पार्सेकर यांचे पक्ष सोडणे क्लेशदायक होते. आता त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचे किंवा नाही, याबाबत केंद्रीय पातळीवरच काय तो निर्णय होणार आहे.

उत्पल पर्रीकर यांच्या बाबतीत ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र असल्यामुळे पक्षाने त्यांना पक्ष सोडून अपक्ष लढू नका म्हणून सांगितले होते. ते तरुण असल्यामुळे येत्या काळात त्यांच्या उमेदवारीचा विचार पक्ष करू शकतो, असेही त्यांना सांगण्यात आले. मात्र त्यांनीही पक्ष सोडला व अपक्ष लढले. आता त्यांना पक्षात घ्यायचे की नाही याबाबतही केंद्रीय स्तरावर निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले.

दिगंबर कामत हे पक्षाचे माजी नेते आहेत. त्यांनी पक्ष सोडल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. कारण ते विरोधी पक्षात गेले होते. राजकीय पक्ष हे जेव्हा एकमेकांचे विरोधक असतात तेव्हा टीका टिप्पणी होतच असते. ज्यावेळी कामत यांच्यासह एकूण आठ आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला त्या वेळी प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण त्यांना पक्षात प्रवेश दिला. पक्षाची सर्व धोरणे या आमदारांनी मान्य केली आहेत. त्यांनी पक्षाचे भरीव काम करावे. चांगले काम केलेल्यांचा पक्ष निश्चित विचार करील, असा संदेश आपण त्यांना देत आहोत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT