गोवा

गोवा : फोंड्यात पुलाखाली वाहनतळ; दारूच्या पार्ट्या

दिनेश चोरगे

फोंडा ; पुढारी वृत्तसेवा :  शहर व लगतच्या परिसरातील चौपदरी रस्त्यांचे 'अंडरपास' हे वाहनांच्या पार्किंगसाठी तर रात्रीच्यावेळी हे अंडरपास तसेच चौपदरी रस्त्यांवर दारुच्या पार्ट्या करण्यासाठी वापरले जात असल्याने या अंडरपासमध्ये अंदाधुंदी सुरू आहे. कुर्टी येथील तर अंडरपासमध्ये बिनधास्त भाजी व फळांचे गाडे ठेवण्यात आले असून मासेविक्रीही या बगल मार्गांवर होत असल्याने सगळीकडे दुर्गंधी पसरलेली असते.

कुर्टी – फोंडा तसेच ढवळी – फर्मागुढी चौपदरी रस्त्यावेळी आवश्यक त्या ठिकाणी भुयारी मार्ग अंडरपास बांधण्यात आले. या अंडरपासमध्ये मोकळी जागा राहत असल्याने विशेषतः कुर्टी भागातील अंडरपासमध्ये बिनधास्तपणे ट्रक तसेच टेम्पो व इतर चारचाकी वाहने पार्क केलेली असतात. ही वाहने पार्क करण्याच्या प्रकारामुळे फोंड्याहून कुर्टी, केरी, सावईवेरे, वळवई भागात जाणार्‍या वाहनांना सुरळीत वाहतुकीसाठी अडचणीचे ठरत असून या ठिकाणी अपघातांचे सत्रही सुरू आहे. मिळेल तेथून वाहने नेण्याचे प्रकार घडत असल्याने हे अपघात होत आहेत. वाहनांच्या पार्किंगसोबतच भटकी गुरे व कुत्रेही अशा अंडरपासमध्ये ठाण मांडून बसत असल्याने सुरळीत वाहतुकीसाठी दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे.

रात्रीच्यावेळी तर ही कुत्री अंगावर धाऊन जात असल्याने विशेषतः दुचाकीस्वारांवर मोठा बाका प्रसंग उद्भवत आहे. संबंधित सरकारी यंत्रणेने या अंडरपास तसेच चौपदरी रस्त्यांवरील अनागोंदीकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. अवजड वाहनेही अंडरपासमध्ये कुर्टी येथील अंडरपासमध्ये अवजड वाहने पार्क करण्याचे प्रकार सर्रासपणे निदर्शनास येत आहेत. या अवजड वाहनांबरोबरच चारचाकी वाहनेही बिनधास्तपणे पार्क केलेली असतात. शिवाय भाजीपाला व फळे आणि शहाळी विकणार्‍यांनी या ठिकाणी ठाणच मांडलेले असते. सरकारी यंत्रणेने याकडे त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.

अंडरपासमध्ये वाहने पार्क करण्याच्या प्रकारामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. यावर नियंत्रण यायलाच हवे. पोलिस तसेच वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांनी व संबंधित सरकारी यंत्रणेने याकडे त्वरित लक्ष द्यावे.
– संतोष नाईक
नागझर – कुर्टी

अंडरपास व चौपदरी रस्त्यांवर रात्रीच्यावेळी बेवड्यांची जत्राच भरते. या ठिकाणी दारुपानाबरोबरच अंमली पदार्थांचेही सेवन होत असल्याचा संशय आहे. सरकारी यंत्रणेने त्याची खातरजमा करून घ्यावी.
– निलेश सीमेपुरुषकर
ढवळी – फोंडा

रात्री रिकामटेकड्यांच्या पार्ट्या
कुर्टी, ढवळी तसेच इतर भागातील अंडरपास व चौपदरी रस्त्यांवर रात्रीच्यावेळी बेवड्यांच्या पार्ट्या रंगत असतात. सध्या पाऊस असल्याने या पार्ट्यांवर नियंत्रण आले असले तरी अंडरपासमध्ये तसेच चौपदरी रस्त्यांवर दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. गेल्या महिन्यात कुर्टी – खांडेपार चौपदरी रस्ता तसेच खांडेपारच्या नवीन पुलावरील रस्त्यावर फेकलेल्या दारुच्या बाटल्या गोळा करण्याचे काम तेथील काही समाजसेवकांनी केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT