गोवा

गोवा : प्राणघातक हल्ल्यात हडफडेत तरुण गंभीर

दिनेश चोरगे

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा :  नागवा-हडफडे येथे झालेल्या सुरी हल्ल्यात कळंगुट येथील रवी शिरोडकर (30) हा युवक जबर जखमी झाला. गोमेकॉत दाखल केल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. त्याची प्रकृती सुधारत असल्याचे हणजूण पोलिस सूत्रांकडून समजते. दरम्यान, पोलिसांनी टारझन पार्सेकर या पर्रा येथील तरुणाला गजाआड केले आहे. अन्य सहाजणांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे साडेतीनच्या दरम्यान नागवा सर्कल जवळ ही घटना घडली. रेंट अ बाईक व्यावसायिक रवी शिरोडकर हा रात्री एका पार्टीला गेला होता, पहाटे साडे तीनच्या सुमारास त्याला त्यांच्या मित्राचा फोन आला, त्यानंतर तो पुन्हा मित्रांबरोबरच बाहेर पडला. तो व त्याचे काही मित्र नागवा सर्कलजवळ उभे असताना इनोव्हा व बलेनो कारमधून आठ ते दहाजण त्या ठिकाणी आले. त्यातील चार-पाच जणांनी रवीवर सुरीने हल्ला केला. यात नागवा येथील संशयित टारझन पार्सेकर व आणखी तिघानी रवीच्या पोटावर सुर्‍याने वार केले आणि पळून गेले, असे रवीने रुग्णालयात आपणाला सांगितल्याचे चुलत भाऊ तक्रारदार उदय शिरोडकर म्हणाले.

रवी याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल कारण्यात आले आहे. हणजूण पोलिसांनी अवघ्या एका तासात संशयित टारझन पार्सेकर याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात भादंसं 307, 143, 147, 148 आर/डब्ल्यू 149 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. त्याला अटकही झाली आहे. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला कारण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज असून उपनिरीक्षक तेजकुमार नाईक तपास करीत आहेत.

पळून जाण्याचा प्रयत्न

टारझन पार्सेकर याला ताब्यात घेऊन हणजूण पोलिस स्थानकात आणल्यानंतर चौकशी सुरू असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो पोलिसांनी हाणून पाडला. त्यामुळे पोलिस ठाण्यात काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता. उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक यांनी पाठलाग करून पुन्हा ताब्यात घेतले.

हल्ल्याचे कारण की…

हा हल्ला व्यावसायिक वादातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिली. हल्ला करणार्‍या अन्य सहकार्‍यांची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.

हल्ला पूर्वनियोजित : उदय शिरोडकर

रवी शिरोडकर हा बागायतीत श्री बाबरेश्वर देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष उदय शिरोडकर यांचा चुलत भाऊ आहे. हल्ला पूर्वनियोजित असल्याचे उदय यांचे म्हणणे आहे.

दारूच्या नशेत हल्ला

या घटनेतील सर्व तरुण दारू पिलेले होते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. नशेतच त्यांनी हल्ला केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

गुन्ह्यांची मालिकाच

राज्यात गंभीर गुन्ह्यांची मालिकाच सुरू आहे. दररोज कोठे ना कोठे गंभीर गुन्हा घडतो आहे. गुन्ह्यांचा हा चढता आलेख चिंताजनक आहे. पर्यटननगरीतील या घटना पर्यटकांनाही घाबरविणार्‍या आहेत. गंभीर गुन्ह्यांबरोबरच दररोज वाढणारे गंभीर अपघात आणि त्यातील हृदयद्रावक मृत्यू मन विषण्ण करणारे आहेत.

SCROLL FOR NEXT