पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी नव्या धोरणांची आणि कायद्याची गरज असल्याचे मत पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले. बुधवारी पर्यटन खात्याच्या मागण्यांवर ते विधानसभेत बोलत होते.
खंवटे यांनी सांगितले की, खाणी बंद झाल्यावर राज्याची अर्थव्यवस्था पर्यटनवर अवलंबून आहे. असे असले तरी या खात्यात काही कमतरता आहेत. काही विभागात खात्याला जास्त अधिकार देणे आवश्यक आहे. यासाठी आम्हाला स्वतःचे सुरक्षा दल हवे आहे. नवीन कायद्याचा मसुदा करण्याचे काम सध्या सुरु आहे. खात्यातर्फे सर्वसामावेशक किनारी व्यवस्थापन सुरू करण्याचा विचार आहे. यामध्ये जीवरक्षक, स्वच्छता, सुरक्षा आणि टेहळणी एकत्रितरीत्या करण्यात येणार आहे. राज्यातील जलक्रीडा आणि शॅकधोरनाचा आढावा घेणेही आवश्यक आहे. याशिवाय अॅप आधारित टॅक्सी सेवा देणे आवश्यक आहे.
राज्यात लवकरच चार मॉडेल शॅक
खंवटे यांनी सांगितले की, राज्यात लवकरच चार मॉडेल शॅक बांधण्यात येणार आहेत. येथे सर्व सुविधा प्लग ऍण्ड प्ले स्वरूपाच्या असणार आहेत. याशिवाय पर्यटकांसाठी विशेष ऍप, क्यूआरकोड , किनार्यांवर पर्यटन विभाग सुरु करण्यात येणार आहे.