गोवा

गोवा : नोकर्‍या विकल्या 70 कोटींना : विजय सरदेसाई

दिनेश चोरगे

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या नोकर भरतीवरून बुधवारी विधानसभेत गोंधळ झाला. आमदार विजय सरदेसाई यांनी या घोटाळ्यात 70 कोटी रुपये खाऊन नोकर्‍या विकल्याचा आरोप केला. एकेका नोकरीसाठी 25 ते 30 लाख रुपये मागितल्याचे ते म्हणाले. नवीन नोकर भरती गोवा लोकसेवा आयोग (जीपीएससी) किंवा कर्मचारी आयोगातर्फे (एसएससी) करावी, अशी मागणीही त्यांनी केली.  सरकारने ती मान्य केली नाही.

यानंतर युरी आलेमाव, वेन्झी व्हीएगस, एल्टन डिकॉस्टा, कार्लोस फेररा यांनीही ही मागणी लावून धरली. आमदारांनी याबाबत सभागृह समिती स्थापन करण्याची मागणी केली; मात्र तीही मंजूर करण्यात आली नाही. विजय यांनी नोकर भरतीमध्ये घोटाळा होता का नाही ते सांगावे, अशी मागणी केली. मंत्री नीलेश काब्राल यांनी याबाबत दक्षता खात्याची चौकशी सुरू असून, त्याचा अहवाल आल्यावर घोटाळा होता का नव्हता, हे कळेल, असे संगितले.

ते म्हणाले, या नोकर भरतीतील घोटाळ्याबाबत आम्ही डिसेंबर 2021 मध्ये सांगितले होते. नोकरीसाठी लाखो रुपये घेण्यात आले होते. जणू काही जागांचा लिलाव करण्यात आला. यानंतर सध्याचे मंत्री बाबूश मॉन्सेरात आणि सुदिन ढवळीकर यांनीही याबाबत विधान केले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर सरकारने ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द करणार असल्याचे सांगितले होते. आता नोकर भरती पुन्हा जुन्या मार्गाने म्हणजेच खात्या मार्फत केली, तर त्यातही भ्रष्टाचार होणार नाही, याची शाश्वती कोण देणार?
या घोटाळ्याच्या चौकशीसाठी सभागृहाची समिती नेमावी, या मागणीवरून मोठाच गदारोळ झाला. युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्टा, विरेश बोरकर, अ‍ॅड. कार्लुस फेरेरा आदी एकाचवेळी उभे राहून बोलू लागले. यावेळी कोण काय बोलतो आहे, तेही समजत नव्हते. काही
मिनिटे हा गोंधळ असाच सुरू राहिला.

'हो' की 'नाही' इतकेच सांगा

घोटाळ्याच्या विषयावरून विजय यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. ते प्रारंभी सहा मिनिटे बोलले. घोटाळा झालेला आहे, हे मान्य आहे की नाही, इतकेच सांगा, असा त्यांचा आग्रह होता. 'हो' की 'नाही' अशा शब्दातच त्यांना उत्तर हवे होते, जे काब्राल यांनी त्यांना दिले नाही. काब्राल बोलण्यास उभे राहिले. यावेळी विजय पुन्हा बोलू लागले. तू सहा मिनिटे भाषण दिलास आणि मी एक मिनिटही बोललो नाही तर तू व्यत्यय आणतो आहेस. यावर विजयने भाषण नाही केले, इतिहास सांगितला, असे उत्तर दिले. काब्राल यांच्या कोकणी बोलण्यावरही विजय तिरकस प्रतिक्रिया देत होते. मी तुला इंग्रजीत सांगू का, असे काब्राल म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या भरतीला स्थगिती दिल्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो, मी असे प्रथमच करत आहे, असेही विजय म्हणाले.

पुन्हा परीक्षा घेण्यास दक्षता खात्याची परवानगी

काब्राल यांनी सांगितले की, या पदांवर पुन्हा परीक्षा घेण्यास दक्षता खात्याने परवानगी दिली आहे. ज्या 386 जणांनी यापूर्वी अर्ज केले होते त्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दक्षता खात्याची चौकशी सुरूच राहणार आहे.

SCROLL FOR NEXT