गोवा

गोवा : नियतीने आधारच हिसकावून घेतला

दिनेश चोरगे

मडगाव; विशाल नाईक : माझे पती आजाराने त्रस्त आहेत. त्यांना डोळ्यांनी दिसतही नाही. घरची परिस्थिती बिकट असल्याने मीच काबाडकष्ट करून चारही मुलांना वाढवले होते. धाकटा रोहित शिकून मोठा व्हावा आणि कुटुंबाचा आधार बनवा, हेच सर्वांचे स्वप्न होते. गरिबीचे चटके त्याला बसू नयेत, यासाठी मी जीवाचे रान केले होते; पण नियतीला ते पहावले नाही. आमच्या आधारालाच हिसकावून नेले. आता मी कोणाच्या आधारावर जगू, असा छाती पिटाळून लागणारा आक्रोश करत छाया यांनी आपल्या मुलाचे अंत्यदर्शन घेतले.

बुधवारी कोटार्ली येथील साळावलीच्या कालव्यात बुडून तेरा वर्षीय रोहित उर्फ सुरेश जाधव या नववीतील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी त्याचा मृतदेह मधलावाडा येथील त्याचा घरी आणला. बुधवारी रात्रीपासून मुलाच्या दुःखाने त्याची आई छाया व्याकूळ झाली होती. गेल्या चोवीस तासात त्यांनी पाण्याचा थेंबही घेतला नव्हता. रोहितच्या नावाचा त्या रात्रभर जप करत होत्या. वारंवार शुद्ध हरपत होती. पण डोळ्यात अश्रू मात्र आटत नव्हते. सायंकाळी रोहितचा मृतदेह घरी आणताच त्याचा चेहरा पाहून तिने एकच हरबंडा फोडला. हे देवा आता मी काय करू आणि कोणासाठी जगू असा आक्रोश करत तिने मुलाच्या पार्थिवाला कडकडून मिठी मारली. मला न सांगता कुठेही न जाणारा मला आज कायमचा का सोडून गेला, असे म्हणत त्यांनी आक्रोश फोडला. देवाकडे मागायलाही आता काहीच शिल्लक राहिले नाही. माझ्या निष्पाप मुलाचा जीव घेणार्‍याला देवच पाहून घेईल. देव असेल तर मला न्याय मिळेल, असेही त्या म्हणाल्या.

रोहित सांगेच्या युनियन हायस्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी होता. बुधवारी तो हायस्कूलमधून परत येऊन जेवण घेऊन बसला होता. त्याचवेळी गावातील त्याचा मित्र घरी येऊन त्याला आंघोळीला जाऊया, असे सांगून घेऊन गेला. मात्र त्याचा रोहितचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. दै. पुढारीशी बोलताना छाया म्हणाल्या की, आपण कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी शेळपे औद्योगिक वासाहतीत असलेल्या फिश मिल प्रकल्पात कामाला जाते. सायंकाळी घरी आले तेव्हा रोहित घरी परतला नसल्याचे कळाले. त्याच्या मित्राला आपण फोन केला असता, तो कालव्यात गेला असल्याचे त्याने आपल्याला सांगितले. तो बुडल्याची माहिती द्यायला त्याचा मित्राने तब्बल चार तास काढले. ज्या जागी रोहित बुडाला होता ती जागा आमच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

घातपात झाल्याचा बहिणीचा आरोप

माझ्या भावाला पाण्यात ढकलून मारण्यात आले आहे, असा आरोप रोहित याची बहीण नंदिनी नादिगीरे यांनी केला आहे. रोहित त्या मित्राबरोबर जायला तयार नव्हता. त्याने जबरदस्तीने त्याला आपल्या दुचाकीवर बसवून नेले. त्याच्या मित्राकडे मोबाईल फोनही आहे. त्याने आम्हाला तो बुडाल्याची कल्पना दिली नाही. आम्ही त्याला रोहितच्या चौकशीसाठी फोन केला, त्यावेळी त्याने तो बुडून मेला आहे, असे उत्तर आम्हाला दिले. रोहित पाण्यात बुडाला पण त्याचा मित्र बाहेर कपड्यात होता. तो पाण्यात उतरलाच नाही. मुख्य रस्ता अगदी जवळ असताना त्याने कोणाकडून मदतही घेतली नाही. संपूर्ण प्रकार संशयास्पद असून आम्ही त्याबाबत पोलिस तक्रार दाखल करणार आहोत, असे नंदीनी यांनी सांगितले

शरीरावर मारहाणीचे व्रण नाहीत : पोलिस

पोलिस निरीक्षक पेडणेकर यांनी त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे सांगितले. त्याच्या अंगावर मारहाणीचे कोणतेही व्रण नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. कोटार्ली येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कालव्यात बुडून आतापर्यंत बाराजण दगावले आहेत. कालव्याच्या काठावरून पाण्यात उडी घेताना पाण्याचा वेगाचा अंदाज त्यांना येत नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

SCROLL FOR NEXT