शिवोली; जयेश नाईक : एका नव्वद वर्षीय महिलेवर त्वरित शस्त्रक्रिया करण्याची गरज असूनही बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तारीख पे तारीख देत आहे. गेल्या आठवड्यात तीन वेळा शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गिरी म्हापसा येथील पार्वती मांद्रेकर ही महिला पडल्याने फ्रॅक्चर झाला आहे. यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. गेल्या आठवड्याभरात तीन वेळा शस्त्रक्रियेची तारीख देऊनही शेवटच्या क्षणी शस्त्रक्रिया रद्द करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या वयोवृद्ध रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर आयसीयूची गरज असते. पण सध्या आयसीयूमध्ये खोली खाली नसल्याचे निमित्त सांगून शस्त्रक्रिया पुढे ढकलली जात आहे. आयसीयूमध्ये खोली उपलब्ध नसल्याने संबंधित डॉक्टरही शस्त्रक्रिया करण्यास तयार नसल्याचे समजते.
शस्त्रक्रिया केल्यास त्यांना थोडाफार आराम मिळू शकतो. ही वयोवृद्ध महिला गेल्या आठ-दहा दिवसांपासून वेदनेने विव्हळत आहे. डॉ. शिवानंद बांदेकर यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी कुटुंबातर्फे केली जात आहे.
पुढील तारीख मंगळवारी
पार्वती मांद्रेकर यांच्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिलेली आहे. मंगळवारी शस्त्रक्रिया होणारच, असे अजून तरी कोणी ठामपणे सांगत नाही. त्यामुळे मांद्रेकर कुटुंबीय चिंतेत आहेत.